आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pair Of Kittu Avika Gava From Kerala Entered In Pune A 50 hour Journey From Thiruvananthapuram, A Pair Of Taras Will Also Be A Feast For Tourists

पुण्यात केरळच्या किट्टू-आविका गव्यांची जोडी दाखल:50 तासांचा प्रवास, तरसांची जोडीही ठरणार पर्यटकांचे आकर्षण

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वी कात्रज आणि कोथरूड परिसरात निसर्गातील गव्यांनी पुणेकरांना दर्शन देत घाबरवून सोडले होते. पण त्याच पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात आता केरळच्या थिरुअनंतपूरम येथून दाखल झालेली गव्यांची जोडी मात्र दिमाखाने वावरणार आहे. गव्यांच्या जोडीसोबत तरसांची जोडीदेखील प्राणीसंग्रहालयात विहार करताना पाहता येणार आहे. नुकतेच हे चारही पाहुणे कात्रज येथील प्राणी संग्रहालयात दाखल झाले असल्याची माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

गवा आणि तरस, यांच्या जोड्या थिरुअनंतपूरम येथून मोठा प्रवास करून पुण्यात दाखल झाल्या आहेत. गव्याची मादी सुमारे 6 वर्षांची आहे, तर दुसरा नर गवा दोन वर्षांचा आहे. प्राणी संग्रहालयात नर गवा आधीपासूनच आहे. त्याच्या जोडीला आता दोन गवे दाखल झाले आहेत. जुन्या गव्याने या नव्या मित्रांचा स्वीकार केला आहे. गव्यांसाठी सुमारे सहा हजार स्क्वेअर मीटर परिसर राखीव असून, तो खंदकाने वेढला आहे.

तरसही आले

तरसाच्या जोडीला अद्याप खंदकात सोडण्यात आलेले नाही. लवकरच त्यांना खंदकात सोडले जाईल. त्यांच्यासाठीच्या खंदकाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांच्यासाठी सुमारे दीड हजार स्क्वेअर मीटरचा खंदक तयार केला आहे. तरसाच्या जोडीचे वय दोन व तीन वर्षांचे आहे. तरसाची जोडी संग्रहालयात लांडग्याची शेजारी होणार आहे. त्याचप्रमाणे संग्रहालयात जंगल कॅट, लेपर्ड कॅट आणि शेकरू हेही प्रथमच दाखल झालेले प्राणी आहेत. आगामी काळात झेब्रादेखिल संग्रहालयात दाखल होणार आहे,’.

थिरुअनंतपूरमला पोपट रवाना

जाधव म्हणाले, गेली दोन वर्षे प्राणी संग्रहालये पूर्ण बंद होती. ती आता खुली झाली आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या देवाणघेवाणीला सुरुवात झाली आहे. दोन गवे आणि तरस जोडीच्या बदल्यात आपण थिरुअनंतपूरम प्राणीसंग्रहालयाला भेकराची जोडी आणि आफ्रिकन ग्रे पोपट दिले आहेत. पुण्याच्या प्राणीसंग्रहालयात तरस ही प्रजाती प्रथमच दाखल झाली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर, पुण्याने गवे आणि तरसाची मागणी नोंदवली होती.

50 तासांहून अधिक प्रवास

संग्रहालयातील प्राण्यांना त्यांच्या मूळ जैविक अधिवासाप्रमाणे वातावरण मिळावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. प्राणी संग्रहालयात नुकत्याच दाखल झालेल्या गव्यांनी आणि तरसांनी सलग 50 तासांहून अधिक प्रवास केला आहे. गव्यांसाठी आम्हाला गाडीच्या रचनेतही बदल करावे लागले. प्राणी बिथरू नयेत, याचीही काळजी घेतली. प्राण्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून त्यांची पूर्ण तपासणी केल्यावरच त्यांना खंदकात सोडले जाणार आहे. गव्यांना त्यांच्या खंदकात नुकतेच सोडण्यात आले आहे. तरसाची जोडी मात्र खंदकाची काही कामे सुरू असल्याने थोड्या दिवसांनी खंदकात सोडली जाईल. अशी प्रतिक्रिया राजकुमार जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...