आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पाकधार्जिण्या घोषणा?:व्हिडिओ बनावट असावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 70 जणांवर गुन्हा दाखल

पुणे8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशविघातक कारवाया केल्याच्या संशयावरून एनआयए, ईडी आणि एटीएसच्या पथकाने संयुक्तपणे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १२ राज्यांतील अनेक कार्यालयांवर गुरुवारी छापे टाकले. या कारवाईत १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. पुण्यातही एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढव्यातून दोघांना अटक केली. याविरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करताना एकाने “पाकिस्तान जिंदाबाद’, “नारा ए तकबीर’, ‘अल्लाह हू अकबर’ अशी घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी अशी घोषणाबाजी झालीच नसल्याचा दावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले, तर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ बनावट असावा, असे म्हटले आहे.

पीएफआयच्या कारवाईविरोधात शुक्रवारी सायंकाळी काही जणांनी पोलिस परवानगी न घेता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी आंदोलकांपैकी एकाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशी घोषणा देण्यात आली. बेकायदेशीर आंदोलन केल्याने पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घोषणाबाजी झालीच नाही : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यांनी बेकायदेशीररीत्या आंदोलन केले. याप्रकरणी तत्काळ ४१ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, तर ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी “पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली नाही. - सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दाेन
असे नारे सहन केले : पुण्यात समाजकंटकांनी दिलेल्या पाक धार्जिण्या घोषणांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलिस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हिंदू गप्प बसणार नाहीत : केंद्र व राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा. पाकिस्तान आठवत असेल तर पाकिस्तानात चालते व्हा. - राज ठाकरे, मनसेप्रमुख

व्हिडिओ बनावट असल्याचा पोलिसांना संशय : फडणवीस
पाकिस्तान जिंदाबादचे व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे पोलिसांनी पुण्यात अशा घोषणा दिल्या गेल्या नाहीत, असे स्पष्ट केले आहे. मात्र, महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारे जिथे असतील तेथून त्यांना शोधून काढू, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.