आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी:विठुरायाच्या नामघोषात दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन; दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन रात्री मुक्काम

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, या उक्तीची प्रचीती देणारा भक्तीमय स्वागत सोहळा लक्षावधी भाविकांच्या साक्षीने बुधवारी पुण्यात साकारला. श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी सायंकाळी उशिरा पुण्यात आगमन झाले.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान काल झाले होते. मंगळवारी रात्री आळंदी येथील आजोळघरी माऊलींच्या सोहळ्याचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. त्याच वेळी आकुर्डी येथे विसावलेला तुकोबांचा पालखी सोहळादेखिल पुण्याच्या दिशेने निघाला. बुधवारी सायंकाळी पुणे मुंबई रस्त्यावरून संचेती चौकानजिक दोन्ही पालखी सोहळ्यांची हद्य भेट झाली आणि लक्षावधी भाविकांच्या मुखातून 'जय जय राम कृष्ण हरी ' असा जयघोष उमटला.

रस्त्यावर दुतर्फा पुणेकर भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी जमली होती. 'माऊली माऊली 'असा गजर सुरू होता त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. शहरात मुख्य चौकात, मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. पालख्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर दुतर्फा भाविक पालख्यांवर फुले उधळत होते.

माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांचा पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी विसावला. पुणेकरांच्या वतीने आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच आमदार व नगरसेवक यांनी सोहळ्याचे औपचारिक स्वागत केले. शुक्रवारी सकाळी दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत सोबत प्रवास करतील. माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाटचाल दिवे घाटातून सासवडपर्यंत होईल तर तुकोबांचा पालखी सोहळा सोलापूर रस्त्याने पुढे जाईल.

-----