आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहूल आषाढी वारीची:माऊलींच्या रथासाठी 'सोन्या आणि मोन्या' ची तगडी बैलजोडी आळंदी येथील भोसले कुटुंबाला मिळाला मान

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला यंदा ‘सोन्या-मोन्या’ बैलजोडी असणार आहे. आळंदीतील तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे. माउलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने दम वाढविण्यासाठी बैलजोडीकडून चालण्याचा सराव करून घेतला जाणार आहेत.

माऊलींच्या पालखी रथाचा गाडा ओढण्याचा मान मिळावा, यासाठी अनेक बैलजोडी मालक प्रयत्नशील असतात. मात्र. आळंदी देवस्थान विश्वस्त समितीच्या निकषांची पूर्तता झाल्याशिवाय माऊली रथाचा मान दिला जात नाही. वारीचा मार्ग खडतर असल्याने बैलजोडी तगडी, भारदस्त आणि ताकदीची लागते.

माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा ११ जून रोजी अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर भोसले कुटुंबीयांनी कर्नाटक राज्यातील राजापूर (ता. निपाणी) गावातील राजू गिरी यांच्याकडून चार लाख रुपयांना ‘सोन्या-मोन्या’ बैलजोडी विकत घेतली आहे. ही मानाची बैलजोडी आळंदीत दाखल झाल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून बैलांची पूजा करण्यात आली.

या बैलांच्या रोजच्या आहारात कडबा, मका, शेंगदाणा पेंड, वैरणचा समावेश करण्यात येत आहे. बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये या उद्देशाने गोठ्यामध्ये गादीचा वापर केला जात आहे.

बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केली जाणार असून आवश्यक औषधौपचार आणि लसीकरण केले जाणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ ओढण्याचे भाग्य आमच्या बैलांना मिळत असल्याने आम्ही आंनदी असल्याची भावना तुळशीराम भोसले यांनी व्यक्त केली.