आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय परीक्षा घोटाळा:पेपरफुटी रॅकेटने कर्नाटक; बिहारच्या 40 परीक्षा केंद्रांवरही केला गैरव्यवहार, परीक्षांमध्ये घोळ करण्याचे बिहारमध्ये प्रशिक्षण

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यभरती पेपरफुटी, म्हाडा आणि शिक्षकभरती गैरव्यवहारामध्ये पकडलेल्या काही एजंट्सचा महाराष्ट्रासह कर्नाटक व बिहारमधील परीक्षांतील गैरव्यवहारांत संबंध असल्याचे आढळून आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये एका आरोपीने आपल्या जाळ्यामार्फत कर्नाटक-बिहारमधील ४० परीक्षा केंद्रांमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे. ही चाळीस केंद्रे आता रडारवर आहेत. पुणे पोलिस यातील एका प्रमुख संशयित आरोपीच्या मागावर आहेत. परीक्षेमध्ये छेडछाड करण्यासाठी बिहारमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचीही माहिती असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

१५ वर्षांपासून बिनबोभाट कारभार : अटकेतील काही एजंट १० ते १५ वर्षांपासून अशा गैरव्यवहारात सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. एका केंद्रात परीक्षार्थींची संख्या २५०, अशा ४० केंद्रांत तब्बल १० हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षा देण्याची क्षमता होती. ही चाळीस केंद्रे संबंधित आरोपीने मॅनेज केली होती.

आरोग्यभरती परीक्षेत १०० पैकी ९२ प्रश्न फोडले
पुणे | आरोग्यभरती परीक्षा गट (ड) संवर्गातील पदाच्या पेपरफुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी २० जणांविरोधात तब्बल ३ हजार ८१६ पानी दोषारोपपत्र पुणे न्यायालयात गुरुवारी दाखल केले. या प्रश्नपत्रिकांमधील १०० पैकी ९२ प्रश्न फोडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून या प्रश्नांची माहिती मोबाइलसह इतर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे प्रसारित केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या साधनांचे विश्लेषण करून सबळ पुरावा प्राप्त झाल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले आहे.

दोषारोपपत्र दाखल झालेले आरोपी : विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (२९), अनिल दगडू गायकवाड (३१), सुरेश रमेश जगताप (२८), बबन बाजीराव मुंढे (४८), संदीप शामराव भुतेकर (३८), प्रकाश दिगंबर मिसाळ (४०), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (२६), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (५०), डॉ. संदीप त्र्यंबकराव जोगदंड (३६), श्याम महादू मस्के (३८), राजेंद्र पांडुरंग सानप (५१), महेश सत्यवान बोटले (५३ ), नामदेव विक्रम करांडे (३३ ), उमेश वसंत मोहिते (२४ ), अजय नंदू चव्हाण (३२), कृष्णा शिवाजी जाधव (३३), अंकित संतोष चनखोरे (२३), संजय शाहूराव सानप (४०), आनंद भारत डोंगरे (२७), अर्जुन भरत बमनावत ऊर्फ राजपूत (३०) अशी त्यांची नावे आहेत.

आरोग्य विभागाच्या गट क भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचा संचालक महेश सत्यवान बोटले (रा. कामगार रुग्णालय, वसाहत, मुलुंड, मुंबई) याच्यासह चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. यात प्रशांत व्यंकटराव बडगिरे, डॉ. संदीप त्र्यंबकराव जोगदंड आणि श्याम म्हादू म्हस्के (तिघेही रा. अंबाजोगाई) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षेपूर्वी या आरोपींनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे.

फसवणुकीसह विद्यापीठ कलमांचाही समावेश
भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०९,४२०, १२०-ब, २०१, ३४ सह महाराष्ट्र विद्यापीठ व मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारित) कलम ३ ,५, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींत लातूर, अंबाजोगाईचे अधिकारी, शिक्षकासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश
दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नौदल डॉकयार्डमधील खलाशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, भूम येथील ग्रामीण रुग्णालयातील लिपिक, अंबाजोगाई मनोरुग्ण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...