आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या निकालानंतर यशवंत जल्लाेष करत आहेत. अनेकांनी पैकीच्या पैकी गुण मिळवत कमाल केली. याउलट पुण्यातील एका पठ्ठ्याने वेगळाच विक्रम केला आहे. त्याने सर्व विषयांत ३५ गुण मिळवले आहेत. या गुणांवर ताे ढकलपासही झाला आहे. विशेष म्हणजे, मी खूप अभ्यास केला होता. चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा होती. पण, मार्क मिळाले नाहीत. असे असले तरी मी माझ्या निकालावर खुश आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
शुभम जाधव असे या ‘मार्कवीरा’चे नाव असून तो पुण्यातील गंजपेठेत राहायला आहे. शुभमची घरची परिस्थिती तशी बेताची आहे. वडील कंपनीत कामाला आहेत, तर आई धुणीभांडी करते. शुभमला ९ वीत ६० टक्के मिळाले. १० वीतही चांगले मार्क मिळवण्यासाठी शुभमने अभ्यास केला. त्याला चांगल्या गुणांची अपेक्षा होती. शुक्रवारी सकाळी जेव्हा निकाल लागला, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला एक नव्हे, दोन नव्हे तर सर्व सहाही विषयांत ३५ गुण मिळाले व ताे उत्तीर्ण झाला. सुरुवातीला कमी गुण मिळाल्यामुळे दु:ख झाले. पण, त्याचबराेबर उत्तीर्ण झाल्याचा त्याला आनंदही झाला. या ‘विक्रमी’ गुणांबद्दल त्याला विचारले असता शुभम म्हणाला, “मी चांगला अभ्यास केला. रोज मी रात्र जागून अभ्यास करायचो. त्यामुळे मला चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. पण, फक्त ३५ टक्केच मिळाले. मार्क कमी असल्याचे दु:ख आहेच, पण पास झाल्याचा आनंदही आहे.’ शुभमला काॅमर्सला जायचे आहे. भविष्यात काय बनायचे असे काही निश्चित नाही. पण पोलिस बनायला मला आवडेल, असे ताे म्हणाला.
१२ वीत चांगले गुण मिळवणारच
दहावीत ३५ टक्के मिळवून शुभम खचला नाही. त्याने १२ वीत चांगले गुण मिळवण्याचा दृढनिश्चय केला आहे. आता कमी गुण मिळाले असले तरी मी पुन्हा चांगला अभ्यास करीन आणि १२ वीत खूप चांगले मार्क मिळवीन, असा विश्वास त्याने केला आहे.
असाच आत्मविश्वास हवा
कमी मिळाल्याने अनेक मुले हताश होऊन टोकाचे पाऊल उचलतात. त्यांच्यासाठी शुभमचे उदाहरण महत्वाचे आहे. ३५ टक्के गुण मिळाले असले तरी त्याचा आत्मविश्वास मात्र कायम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.