आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दहावीचा निकाल:जुन्या 80-20 गुणाच्या पॅटर्नमुळे उसळली निकालाची टक्केवारी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई विभागात दहावी परीक्षेत अनन्या शर्मा हिने ९९.४० टक्के गुण मिळवले. मैत्रिणीसाेबत सेल्फी काढत आपला आनंद असा जल्लोषात साजरा केला.
  • ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; 100 गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूरचे

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल यंदा तब्बल १८ टक्क्यांनी उसळल्याने शिक्षण क्षेत्रात या उसळीमागील कारणांची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी गुणांची टक्केवारी लक्षणीयरीत्या कमी झाल्याची चर्चा झाली होती. यंदा टक्केवारी बरीच वाढल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली.

मागील वर्षी (२०१९) ८०-२० पॅटर्न रद्द करण्यात आला होता. सर्व विषयांची पूर्ण गुणांची (शंभरपैकी) परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे एकूण गुणांची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरली होती. त्याआधी २० गुणांची अंतर्गत मूल्यमापन व्यवस्था म्हणजे गुणांची खिरापत असल्याची टीका झाली होती. हे २० गुण शाळांच्या हातात असतात. कुठल्याच शाळेला आपला निकाल कमी यावा, हे नको असते. त्यामुळे या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांमध्ये सर्रास गुणांचे वाटप होत असल्याचेही बोलले जात होते. त्या पॅटर्ननुसार गेल्या वर्षी लागलेला निकाल खूपच कमी टक्केवारीचा होता.

परंतु, लगेचच राज्य शासनाने नवे आदेश जारी करून, २०२० मध्ये जुना ८०-२० पॅटर्ननुसार परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा ८० गुणांचीच लेखी परीक्षा घेण्यात आली. २० गुण अंतर्गत मूल्यमापनाचे होते. त्याचा परिणाम यंदाच्या निकालावर दिसून आला आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण असल्याने आणि ते पूर्णपणे शाळेच्या अखत्यारीत असल्याने टक्केवारी उसळली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. याला कृतीपत्रिका पद्धतीची जोड मिळाली. शिवाय यंदा कोरोना संकटामुळे जो लॉकडाऊन जाहीर झाला, त्यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला. त्या विषयाचे गुणही बोर्डाला सरासरीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला द्यावे लागले. त्याचाही परिणाम गुणांची टक्केवारी वाढण्यात झाला आहे.

‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १०० गुण मिळवणारे १५१ विद्यार्थी लातूरचे

दहावीचा बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध प्रकारची आकडेवारी समोर येताच राज्यातील शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लातूर विभाग प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण निकालाच्या क्रमवारीत राज्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. राज्यात यंदा एकूण २४२ विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. त्यापैकी तब्बल १५१ विद्यार्थी लातूरचे आहेत. त्यामुळे सर्वत्र ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा रंगली आहे.

दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे राज्यात निकालाची सर्वात कमी टक्केवारी असणाऱ्या औरंगाबाद विभागातही पैकीच्या पैकी गुण मिळवणारे ३६ विद्यार्थी आहेत. कोल्हापूर विभागात १५, पुणे व अमरावती विभागात प्रत्येकी १२, कोकण विभागात ११, नागपूर विभागात ३, मुंबई विभागात दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळवता आलेले नाहीत, असे आकडेवारी सांगत आहे.

गेल्या वर्षी राज्यभरात फक्त २० विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळवता आले होते. त्यातही १६ विद्यार्थी लातूर विभागाचे होते. २०१८ मध्ये राज्यात १२५ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले होते. त्यातील ७० विद्यार्थी लातूरचे होते. लातूरची ही पैकीच्या पैकी गुणांची परंपरा यंदाही राखली गेली असून शंभर टक्के गुण मिळवणारे ६० टक्के विद्यार्थी लातूरचे आहेत.