आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या विरोधात आज पिंपरी चिंचवड शहर बंद:बंदला पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जुने झाले आहे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणावर समाजाच्या सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर राज्यपालांनी खाजगीरित्या बचावात्मक पवित्रा घेतला आहे. मात्र, अद्याप राज्यपालांनी जाहीररित्या जनतेची माफी मागितली नसल्याने, राज्यभरातील शिवप्रेमी आंदोलक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राज्यपालांच्या विरोधात गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात बंद पुकारण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष संघटना या बंदमध्ये सहभागी झाले असून त्यांनी नागरिकांना दुकाने, उद्योग तसेच हॉटेल बंद ठेवण्याचे आव्हान केले आहे. त्याच सोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याच्या दृष्टीनेही आंदोलनकर्तेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे आंदोलन कर्त्याना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. राज्यपालांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्याची जाहीर माफी मागावी. त्याचप्रमाणे त्यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. वारंवार विविध राष्ट्र पुरुषांच्या संदर्भात राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अवमान करत आहे. ही बाब राज्यातील तमाम जनतेला न पटणारी असल्याचे मत आंदोलन कर्त्यानी व्यक्त केली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी बाळगलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरा नंतर पुणे शहरातील विविध संघटना आणि पक्ष यांनी एकत्रित येऊन 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिलेली आहे. यावेळी शहरातील सर्व व्यवहार बंद राहतील यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करून राज्यपाल विरोधात ठोस भूमिका घेण्यास भाग पाडू असे मत सर्व पक्षीय आंदोलन कर्त्यानी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...