आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ नागरिकांबरोबरच समाजातील निराधार, वंचित घटकांसाठी सेवा देणे हाच खरा मानवता धर्म आहे, त्यामुळे अशा लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी केले.
देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून विविध उपक्रम तसेच योजना देशात युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत असेही त्या म्हणाल्या.
राज्यमंत्री प्रतिमा भौमिक बुधवारी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी पानशेत येथील जनसेवा फाउंडेशन संचलित वृद्धाश्रम व विविध प्रकल्पांना भेटी दिल्या त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वृद्धाश्रम, वसतीगृह तसेच इतर योजनांची माहिती राज्यमंत्री भौमिक यांनी यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ.विनोद शहा यांच्याकडून जाणून घेतली.
यावेळी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नैसर्गिक उपचार पद्धती केंद्राचे उद्घाटन ही राज्यमंत्री भौमिक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सदर प्रसंगी त्यांच्या समवेत समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ.मिलिंद रामटेके, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे संगिता डावखर, यांच्यासह जनसेवा फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा
राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी शासकीय विश्रामगृहात समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडून घेतला. आयुक्त डॉ नारनवरे यांनी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यमंत्री यांना यावेळी करून दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.