आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:एक कवी आपल्यातून जातो तेव्हा...

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ कवी, अनुवादक, संपादक सतीश काळसेकर यांचे पेणमध्ये निधन

ज्येष्ठ कवी, अनुवादक, संपादक, लघु अनियतकालिके चळवळीतील अग्रणी व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर (७८) यांचे पेणमध्ये शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या प्रसिद्ध ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ लेखसंग्रहाला साहित्य अकादमी सन्मान मिळाला. ‘इंद्रियोपनिषद’, लेनिनवरच्या कविता हेही त्यांचे चर्चेतील लेखनकार्य होते. त्यांनी मागोवा, फक्त, तापसी, चक्रवर्ती, तात्पर्य आणि लोकवाङ्मयगृहसाठी दीर्घकाळ संपादनाचे कार्य केले.

लघुअनियतकालिकांची चळवळ समृद्ध करीत लेखक घडवणारा ‘नितळ माणूस’ हरपला
आयुष्यभर अफाट बोहेमियन आयुष्य जगलेला सतीश काळसेकर नावाचा क्रांतीची स्वप्नं पाहणारा एक धाडसी कॉम्रेड, माणूसपणावर अपार श्रद्धा ठेवणारा कवी, खडतर अनुभवांच्या शोधात भारतभर हिंडलेला भटक्या प्रवासी, पुस्तकवेडा वाचक, त्याने लिहिलेल्या कवितांसोबत त्याच्या अवघ्या आयुष्याच्या खुणा मागं सोडून गेला आहे. त्या खुणांवरून आपल्याला भविष्याच्या पोटात हरवलेला रस्ता कदाचित सापडेल...
गेली वीस-बावीस वर्षे काळसेकरांच्या सोबत लोकवाङ्मय गृह, महाराष्ट्र फाऊंडेशनमध्ये काम केलेल्या नितीन रिंढे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे केलेले हे स्मरण...

सतीश काळसेकर गेले व साठोत्तरी लघु अनियतकालिकांच्या अस्वस्थ पिढीतला आणखी एक शिलेदार आपल्याला या ‘अत्यवस्थ’ काळाच्या भोवऱ्यात एकाकी सोडून नाहीसा झाला! क्रांतीची स्वप्नं पाहणाऱ्यांमध्ये असलेला रोमँटिसिझम त्यांच्या नसानसांत इतका भिनलेला असतो की भोवताल कितीही प्रतिकूल बनला, तरी त्यांचा आशावाद, जगण्यावरचा विश्वास ढळत नाही. काळसेकर अशा ‘अढळ क्रांतिकारकां’पैकी एक होते. म्हणूनच आमच्यात कितीही निराशा भिनूदे, भविष्य कितीही अंधकारमय वाटू दे; ते धीर देत म्हणायचे, ‘जातील रे हे दिवस.. सामान्य माणसातल्या माणूसपणावर विश्वास ठेवा. तो हे फार काळ सहन करणार नाही. एकापेक्षा एक जुलूमशहांची तख्तं उलथवून टाकली गेली आहेत. हेही दिवस जातील..’ हे म्हणतानाचा त्यांचा आशावाद दैवावर हवाला ठेवून चांगल्या दिवसांची आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्यांतला नव्हता, तर तरुण लिहित्या-वाचत्या मंडळींशी त्यांचा जागता संवाद अखेरपर्यंत होता.

एकेकाळी अत्यंत बोहेमियन शैलीने जगलेल्या या बिनधास्त धाडसी कवीच्या जीवनाला वयोमानानुसार आणि प्रकृतीधर्मानुसार काही मर्यादा नक्कीच पडल्या होत्या. तरी दोन गोष्टींना त्यांनी मुळीच विराम दिला नाही– एक म्हणजे कविता लिहिणं आणि दुसरं म्हणजे, तरुण लेखकांशी सातत्याने सुरू असलेला संवाद. त्यांच्या या संवादामुळे प्रेरित होऊन लिहिते-वाचते झालेले, अक्षरशः शेकडो तरुण लेखक-कवी आजच्या महाराष्ट्रात सापडतील.

कवीच्या अनुभवाचा पोत बदलल्यावर, जुने लोक म्हणतात तसे अधिक पावसाळे पाहिल्यावर कवीची कविताही बदलते. एकेकाळी प्रखर बंडखोर भाषेत ऐंद्रिय संवेदनांचा स्फोटक आविष्कार करणारी काळसेकरांची कविता अलीकडच्या वीसेक वर्षांत खूप समंजस, आत्मपरीक्षणपर, संवादी, संयत बनली होती. पण, तिच्यातली परिवर्तनाची धग, स्वातंत्र्य या मूल्याची आंच अखेरपर्यंत ताजी होती.

काळसेकरांच्या कवितेत आणि कवितेबाहेरच्या व्यक्तिमत्त्वात जसा निराशेला थारा नव्हता, तसा विखारालाही वाव नव्हता. लघुअनियतकालिकांच्या चळवळीत अनेक वृत्ती-प्रवृत्तींचे कवी-लेखक एकत्र आले होते. कालमानाने त्यांपैकी काही प्रस्थापित व्यवस्थेत स्थिर झाले, तर काही निराशाग्रस्त बनून आपल्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांविषयी कडवट, विखारी बोलू-लिहू लागले. काळसेकरांच्या लेखनाला असल्या विखारीपणाचा स्पर्शही दिसणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच तो नव्हता. अखेरपर्यंत अत्यंत नितळ व्यक्तिमत्त्वाचा राहिलेला हा कवी, जगला अत्यंत मनस्वीपणे.

लघुअनियतकालिक चळवळीला डाव्या विचारांचं अधिष्ठान देणाऱ्या लेखक - कवींपैकी काळसेकर हे प्रमुख कवी. बँकेतल्या नोकरीचा एक भाग म्हणून नव्हे, तर ज्या मूल्यांवर त्यांची निष्ठा होती, त्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी ट्रेड युनियनचं काम अनेक वर्षं केलं. पुस्तकावर मनःपूत प्रेम करणाऱ्या या कवीने खांद्यांवर पुस्तकांचे गठ्ठे स्वतः वाहून, स्वतःच्या मनातलं आदर्श पुस्तकांचं दुकान पीपल्स बुक हाऊसच्या रूपाने मुंबईच्या फोर्टसारख्या व्यापारी इलाक्यात यशस्वीपणे उभं केलं. लोकवाङ्मय गृहाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रातल्या अनेक लिहित्या कवी-लेखकांना शोधून त्यांची पुस्तकं वाचकांसमोर आणली. अगदी आताआतापर्यंत हिमाचलपासून आसामपर्यंत हिमालयातले कष्टप्रद मार्ग तुडवले. ‘जेवढे कष्ट अधिक तेवढा पर्यटनातला आनंद मोठा’ हे त्यांचं भटकंतीमधलं सूत्र त्यांचं ‘पायपीट’ हे पुस्तक वाचणाऱ्यांना परिचित असेल.

पक्षी एकेक काडी जंगलातून कुठून कुठून आणून त्यांचं घरटं बांधतात, तसं काळसेकरांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि जगातून कुठून कुठून पुस्तकं एकेका काडीसारखी आयुष्यभर जमवली आणि त्या पुस्तकांचं घरटं पेण जवळच्या चित्रकुटीर कलाग्राम वसाहतीत डोंगर उतारावर उभं केलं. शहरी सुखसोयींपासून वंचित अशा त्या डोंगरात अनेक खडतर अनुभवांना तोंड देत ते गेले वीस वर्षं राहिले. पुस्तकांमध्ये रमले. आयुष्यभराचा पुस्तकं जमवण्याचा आणि बेफाटपणे वाचण्याचा अनुभवही त्यांनी ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकाद्वारे इतरांशी वाटून घेतला.

आयुष्यभर असं अफाट बोहेमियन आयुष्य जगलेला सतीश काळसेकर नावाचा हा क्रांतीची स्वप्नं पाहणारा कॉम्रेड, माणूसपणावर श्रद्धा ठेवणारा कवी, खडतर अनुभवांच्या शोधात भारतभर हिंडलेला भटक्या प्रवासी, पुस्तकवेडा वाचक, त्याने लिहिलेल्या कवितांसोबत त्याच्या अवघ्या आयुष्याच्या खुणा मागं सोडून गेला आहे. त्या खुणांवरून आपल्याला भविष्याच्या पोटात हरवलेला रस्ता कदाचित सापडेल.

सतीश काळसेकर यांचे जुने सहकारी
नितीन रिंढे

बातम्या आणखी आहेत...