आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा:पोलिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला लवकरच मान्यता देणार

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठीआंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ( दि. 20) केली.

वानवडी येथे एराज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) गट- 2 मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टरचा समारोपउपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या साथीमुळे ते शक्य झाले नाही. आता लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक ट्रॅक, सिंथेटीक टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान, बहुउद्देशिय सभागृह, जलतरण तलाव, वसतीगृह आदी सर्व सुविधा असतील. यामुळे राज्यातील खेळाडूंना फायदा होण्यासोबत राज्याला मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळेल.

मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते. खेळामुळे जिंकण्याची सवय लागण्यासोबत पराभव पचवण्याची क्षमताही निर्माण होते. खेळाडू हार न मानता प्रत्येक पराभवानंतर नव्या यशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच सुरक्षा दलात खेळाला आणि खेळाडूंना विशेष महत्व आहे. ज्याप्रमाणे सैन्यदले देशांच्या सीमांचे रक्षण करतात त्याप्रमाणे पोलीस दल आणि हे खेळाडू देशातील अंतर्गत सुरक्षेचे कार्य करतात. सैन्य आणि पोलीस दलामुळे देशातील जनता सुरक्षित आहे असे सांगून स्पर्धेत पुरुषांसोबत महिलांचा वाढता सहभाग हे बदलत्या भारताचे दृश्य असून देशासाठी अभिमानाची बाब आहे.

पंजाब पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

स्पर्धेत पंजाब पोलिस दल 17 सुवर्ण, 9 रजत, 15 कांस्य पदकासह 41 पदके मिळवून सर्वसाधारण विजेते ठरले. दुसऱ्या क्रमांकावरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाने 15 सुवर्ण 10 रजत व 16 कांस्य पदकासह एकूण 41 पदके मिळवली. महाराष्ट्र पोलीस दलाने 12 सुवर्ण 7 रजत व 11 कांस्य पदकासह एकूण 30 पदके मिळवत सर्वसाधारण तिसरा क्रमांक मिळविला.

पोलीस महासंचालक सेठ म्हणाले, यंदा स्पर्धेत कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबरोबर या स्पर्धेत प्रथमच आर्म रेसलींग, पॉवरलिफ्टींग आणि बॉडी बिल्डींगचा सहभाग करण्यात आला. या स्पर्धेत 25 राज्याचे आणि 5 केंद्रशासित प्रदेश, 6 निमलष्करी दल, रेल्वे पोलीस अशा 37 संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत 2 हजार पुरुष आणि 600 महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची गौरवशाली परंपरा आहे. राज्य पोलीस दलाने अनेक नामांकीत खेळाडूंना नोकरीत घेऊन चांगली संधी दिली आहे.अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाचे प्रतिनिधी व आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विजेत्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सर्व सहभागी संघांनी संचलन करून मानवंदना दिली.

बातम्या आणखी आहेत...