आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:लायसन्स राज कमी झाल्यामुळेच इतक्या वेगाने लसनिर्मिती शक्य झाली : पूनावाला

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगल्या परिणामकारकतेसाठी कोरोना लसीच्या मिश्रणाला माझा पाठिंबा नाही.

सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन डाॅ. सायरस पूनावाला यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची प्रशंसा केली. ते म्हणाले, या सरकारमध्ये लालफीतशाही व परवाना राज घटले आहे. तत्काळ मंजुरी मिळते. यामुळेच कोराेना लस इतक्या लवकर येऊ शकली. पुण्यात शुक्रवारी पूनावालांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. ते म्हणाले की, ‘५० वर्षांपूर्वी मंजुरीसाठी उद्योगांना खूप अडचणी यायच्या. मला स्वत:लाही मंजुरीसाठी नोकरशहा आणि औषध नियामकांसमोर हातापाया पडावे लागले. मात्र आता स्थिती बदलली आहे. यामुळेच सीरमची कोरोना प्रतिबंधक लस कोविशील्ड लावकर येऊ शकली.’

लसींचे काॅकटेल नको
पूनावाला म्हणाले, ‘चांगल्या परिणामकारकतेसाठी कोरोना लसीच्या मिश्रणाला माझा पाठिंबा नाही. त्याची कसलीही गरज नाही. हे अध्ययन हजाराे लाेकांवर चाचण्यांच्या आधारावर सिद्ध झालेले नाही.’ विशेष म्हणजे आयसीएमआरने म्हटले आहे की, काेविशील्ड आणि काेव्हॅक्सिनचे काॅकटेल जास्त प्रभावी ठरू शकते.

लोकमान्य टिळक यांच्या नावे पुरस्कार स्वीकारताना आनंद होत अाहे

स्वदेशी लस तयार करण्याचे लोकमान्य टिळक यांचे स्वप्न सीरम इन्स्टिट्यूटने पूर्ण केले, अशी भावना सीरम समूहाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी व्यक्त केली. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन शुक्रवारी गौरवण्यात आले. या वेळी विश्वस्त आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विश्वस्त डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती रोहित टिळक उपस्थित होते.

डॉ. पूनावाला म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या नावे पुरस्कार स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. लोकमान्य टिळक यांनी १८८९ मध्ये स्वदेशी लसीचा कारखाना भारतामध्ये तयार होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. हडपसर येथे १९६६ मध्ये लस तयार करण्याच्या एका लहान उद्योगापासून सुरू केलेली सीरम इन्स्टिट्यूट आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. लस तयार करण्यापेक्षाही त्याच्या परवानग्या मिळवण्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध होण्यापूर्वी परवानग्या देत असताना नोकरशाही अनेक अडचणी उभ्या करते. कंपन्यांचे अनेक संचालक सरकारी अधिकाऱ्यांसमोर परवानग्यांसाठी वारंवार हात जोडतात. मात्र, कोविशील्डच्या निर्मितीत केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे “परवाना राज’चा अडथळा आला नाही. सध्या जग मोठ्या संकटातून जात आहे. सीरमने अगदी कमी वेळेत लस तयार केली.

कंपनीने स्वतः जोखीम उचलून १० कोटी लसी तयार केल्या होत्या. यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. आजही हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, नागरिकांसाठी महत्त्वाची असणारी लस वेळेत पोहोचवण्याचे काम कंपनीने केल्याचे डॉ. पूनावाला यांनी नमूद केले.

शिंदे म्हणाले, १२० वर्षांपूर्वी देशात प्लेगची साथ असताना लोकमान्य टिळकांनी स्वदेशी लसीचे केंद्र पुण्यात व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सायरस पूनावाला यांनी केला आहे. लोकमान्य टिळक आज जिवंत असते तर स्वदेशी लस पुण्यात तयार झाली म्हणून त्यांनी सायरस पूनावाला यांचे कौतुक केले असते.

पुरस्कार पत्नीला अर्पण
लोकमान्य टिळक यांच्या नावे मिळालेला पुरस्कार हा मी माझ्यासाठी गौरव समजतो. सीरम इन्स्टिट्यूट सुरू होण्यापासून नेहमीच माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या पत्नी दिवंगत वीलू पूनावाला यांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचे डॉ. पूनावाला म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...