आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोंढवा भागातील कृष्णाई नामक इमारतीतील वन बीएचके फ्लॅटमध्ये एका खोलीत चक्क २२ भटकी कुत्री डांबलेली... सोबत एक ११ वर्षांचा मुलगाही बंदिस्त. दोन वर्षांपासून हा मुलगा असा कुत्र्यांसोबतच राहत होता. या मुलास त्याचे आई-वडीलच या खोलीत बंद करून ठेवत. या भटक्या श्वानांच्या भरवशावर मुलास सोडून हे क्रूर दांपत्य दिवसभर कामावर जात होते. एक दिवस एका अनोळखी व्यक्तीचा चाइल्डलाइन हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर फोन आला आणि हा भयंकर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलाची सुटका केली.
घरात दुर्गंधी, मुलगा खिडकीत बसलेला... : चाइल्डलाइनच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हा त्यांना विचित्र प्रकार पाहावयास मिळाला. एक ११ वर्षांचा मुलगा होता व तो खिडकीत कुत्र्यासारखाच बसला होता. त्याच खोलीत घरात वेगवेगळ्या वयाेगटाची २२ कुत्री होती. घरातून खूप दुर्गंधी येत होती. या वेळी मुलाच्या आई-वडिलांना संस्थेच्या सदस्यांनी समज देऊन मुलास शाळेत पाठवा, असे बजावले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. हा प्रकार सुरूच राहिला.
सारेच विचित्र... कुत्र्याच्या कळपात मुलगा : घराला बाहेरून कुलूप आणि घरात कुत्र्यांच्या कळपात मुलगा वावरत होता. अपर्णा मोडक यांनी मुलाच्या आई-वडिलांना सतत फाेन करून बाेलावल्यानंतर ते आले. घरात पाहणी केली तेव्हा प्रचंड अस्वच्छता होती. मुलगा कुत्र्यांसोबत बसलेला होता. त्याचे विचित्र वागणे पाहून बाल कल्याण समिती व पोलिसांकडे रितसर तक्रार करण्यात आली.
तो म्हणे इतर मुलांना चावत होता... : या प्रकाराबाबत शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा विचित्र माहिती कळाली. हा मुलगा दोन वर्षापासून कुत्र्यासाेबत राहत होता. तो शाळेत गेल्यानंतर कुत्र्यासारखा वागू लागला आणि इतर मुलांना चावत असल्याने त्याला शाळेत पाठवणे पालकांनी बंद केले होते. पाेलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या पथकाने परिस्थितीची पाहणी केली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चैताली गपाट करत आहेत.
आई-वडिलांविरुद्ध गुन्हा
कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलाची सुटका केली. परंतु या मुलाची वागणूक आक्रमक आणि विचित्र झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. कोंढवा ठाण्यात चाइल्डलाइन पुणे जिल्हा प्रकल्प समन्वयक अपर्णा मोडक यांनी फिर्याद दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.