आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे यावर्षी पुणे जिल्ह्यातील 366 शेतकऱ्यांचे 49 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून शेतकरी, शेतकरी गट, तसेच महिला स्वयंसहायता समुहांना योजनेचा लाभ होणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी मंगळवारी दिली आहे.
काय म्हणाले काटकर?
एकत्रित शेतमाल, कच्चा माल खरेदी, सामाईक सेवांची उपलब्धता व उत्पादनाची विक्री यादृष्टीने अधिक फायदा व्हावा यासाठी योजनेमध्ये ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या धोरणाचा अवलंब केला आहे. या योजनेमध्ये नाशवंत फळपिके यावर आधारित उत्पादने, दुग्ध व पशुउत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने आदींचा समावेश आहे.
प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू
जिल्ह्याला यावर्षी 365 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट मिळाले होते, तर 366 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 हजार 568 शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी 370 अर्जदारांच्या प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू आहे. 366 जणांचे 49 कोटी 74 लाख रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी 29 कोटी 21 लाख रुपये कर्ज आहे. उर्वरीत 19 कोटी 6 लाख रुपये अनुदान स्वरुपात आहेत,असेही काटकर म्हणाले.
असा मिळतो लाभ
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगासाठी शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, वैयक्तिक मालकी किंवा भागीदारी, सहकारी संस्था, खाजगी कंपन्यांना अनुदान मिळते. बीज भांडवलासाठी ग्रामीण व शहरी स्वयंसहाय्यता गटातील सदस्यांना प्रस्ताव सादर करता येतो. सामाईक पायाभूत सुविधेसाठी शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट किंवा त्यांचे फेडरेशन लाभासाठी पात्र आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.