आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऍग्री वाईज - 2023:युवकांनी शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा -  प्रवीण तरडे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांनी शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, येणारा काळ शेतीचा सुवर्णकाळ असेल असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूल मध्ये झालेल्या ऍग्री वाईज - २०२३ या शेतीविषयक राष्ट्रीय परिषदे उद्घाटन प्रसंगी तरडे बोलत होते. 'रोल ऑफ युथ ईन ऍग्रीकल्चर' हा या परिषदेचा विषय होता.शेती आणि शेतीविषयक व्यावसायिक उपक्रम आणि संकल्पना यांना चालना देण्यासाठी दरवर्षी पुणे बिझनेस स्कूलच्या वतीने ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येते.

प्रवीण तरडे म्हणाले की, आपल्या वाड -वडिलांनी जपलेली शेती आपण केवळ राखणदार म्हणून सांभाळून पुढच्या पिढीकडे सोपवणे हे आपले कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शेती आणि शेतीविषयक उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. आपण शेतीकडे भावनिक दृष्ट्या न पाहता व्यवसाय म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. माझ्या कडील चित्रपट माध्यमातून देखील मी याच बाबींचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.

शेतकरी जगला तर देश टिकेल. अगदी ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐन जिन्नस कर्ज - पद्धती सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सध्याच्या सरकारने या मधून प्रेरणा घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत आणि सर्वात महत्त्वाचे ही ऐन जिन्नस कर्ज - पद्धतीचा शालेय इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात यावा यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असेही तरडे यांनी सांगितले.

देशभरातील नामांकित अनेक बहुराष्ट्रीय शेती विषयक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी या परिषदेस उपस्थित होते. या मध्ये प्रामुख्याने अदवंटा लिमिटेड, सिजेंटा, धानुका, ईटीजी, कारगिल, डीहात, मार्केट्स अँड मार्केट्स, कोरोमंडल, बायोस्टॅड, एचडीएफसी बँक, आयआयसी बँक, फ्युचर मार्केट इनसाइट्स, एफएमसी यांचा समावेश होता. विशेषतः नॅनोटेक्नॉलॉजी आणि पेस्टीसाईड इंडस्ट्री बद्दल परिषदेमधील चर्चा सत्राला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. विशाल भोर, अभिजित जगदाळे, निशिकांत यादव, जितेंद्र आखाडे, विक्रम भंडारी, डॉ. श्रद्धा कुलकर्णी या कॉर्पोरेट प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.