आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५व्या संजीवन समाधी वर्षाचे औचित्य साधून व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताईंच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्त आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालयात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मंत्री अमित देशमुख यांनी दिली. सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तही राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
असे होतील कार्यक्रम
मंत्री अमित देशमुख म्हणाले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ज्ञानियांचा राजा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ व १९ जून रोजी आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व गायक कौस्तुभ गायकवाड हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय दररोज हरिपाठ, व्याख्यान, कीर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तीगीते, भारुड, दिंडी इत्यादी कलांचा आविष्कार या कार्यक्रमात पाहता येणार आहे.
हरिपाठाने सुरुवात
शनिवार, १८ जून रोजी दुपारी चार वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर संत निवृत्ती, संत सोपान व संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर हाईल. अक्षय महाराज भोसले हे कीर्तन सादर करणार आहेत. याच दिवशी रात्री ८ वाजता भारुड, अभंगगीत, भक्तीगीत इ. भक्तीसंगीताचा कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
ओडिसी नृत्य
रविवार, १९ जून रोजी दुपारी चार वाजता हरिपाठ कार्यक्रम होईल. स्वामीराज भिसे महाराज यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडावर आधारित समर्थ पाटील हे भजन सादर करतील. तर प्रमोद महाराज जगताप हे कीर्तन करणार असून, ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावार आधारित ओडिसी नृत्य शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत. तसेच भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान कार्यक्रम सादर करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.