आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Puja Chavan Suicide Case Former Minister Sanjay Rathore Pune Police Clean Cheat Pohardevi's Six Saints Visit Pune Police Commissioner

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांची क्लीन चिट; पोहरादेवीच्या महंतांकडून मंत्रिपदाची मागणी

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोहरावदेवीच्या महंतांनी शनिवारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांना पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडलेली असल्याचे सांगितले. तसे समरी पत्रही या शिष्टमंडळाला दिले.

चौकशी अहवाल मागितला

माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत पोलिस चौकशी अहवालच्या मागणीसाठी पोहरादेवीचे सहा महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार, ॲड अभय राठोड यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेतली.

मृत्यू आकस्मिक झाला

ॲड अभय राठोड म्हणाले, बंजारा समाजाचे महाराष्ट्रत सुमारे दोन कोटी लोक असून संजय राठोड हे त्यांचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, त्यांना आरोप झाल्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि समाजाचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. याप्रकरणी नेमके आरोप झालेल्या केसची वस्तुस्थिती काय आहे यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्त यांची आम्ही भेट घेतली. पोलिसांनी आम्हाला या केसचे समरी पत्रक दिलेले असून त्यात पूजा चव्हाण यांचा मृत्यू आकस्मिक मयत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिपद देण्याची मागणी

महंत सुनील महाराज म्हणाले, संजय राठोड हे पोलिसांच्या अहवालानंतर निर्दोष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावे यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे उद्याची वेळ मागितली आहे. त्याप्रमाणे त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करणार आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे राठोड निर्दोष असल्याने त्यांना पुन्हा मंत्री बनवण्यात भाजपची अडचण जाणवत नाही.

खून केल्याचे निष्पन्न नाही

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे. सदर घटनेतील प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब, मृत मुलीचे आई-वडील, नातेवाईक यांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल, शवविच्छेदन अहवाल याचीही तपासणी करण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...