आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळ्या गाड्यांची आवड असल्याने चोरी:मोलमजुरीचे काम करणाऱ्याने चोरल्या 14 गाड्या, 10 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले असून पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत वाहन चोरीच्या गुन्हयावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार हडपसर पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या एका चोरास जेरबंद केले असून वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहे.याप्रकरणी आरोपीकडून दहा लाख रुपये किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

परशुराम शिवाजी मोरे (वय 24, रा. कोळविरे तालुका-पुरंदर, जिल्हा-पुणे, मुळगाव कलहिप्परगा, तालुका अक्कलकोट ,जिल्हा सोलापूर )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 10 लाख रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत.

त्याच सोबत हडपसर पोलिस ठाण्यातील वाहन चोरीचे सात गुन्हे, भोसरी पोलिस ठाण्याचे दोन गुन्हे, लोणीकंद, विश्रामबाग ,बारामती, विजापूर पोलीस स्टेशन ,सोलापूर ,इंडी कर्नाटक या ठिकाणचे वाहन चोरीचे प्रत्येकी एक असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आलेले आहे. आरोपी हा मोलमजुरीचे काम करतो. त्यास वेगवेगळ्या गाड्यांची आवड असल्याने तो वाहने चोरी करून मूळ गावी घेऊन जात असे.

त्यानंतर तो पुन्हा पुण्यात येत असे तसेच काही वेळेस बारामती ,सोलापूर ,विजापूर कर्नाटक या ठिकाणाहून येताना देखील दुचाकी गाड्या चोरून आणून त्याचा वापर करीत होता असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हडपसर पोलीस वाहन चोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना, एक इसम संशयितरित्या दुचाकीसह पोलिसांना मिळून आला होता. त्यामुळे सदर इसमाकडे गाडीच्या कागदपत्रबाबत विचारणा केली असता, त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून सखोल चौकशी केली असता ,सदर आरोपी परशुराम मोरे याने पुणे शहर ,पिंपरी चिंचवड ,बारामती ,सोलापूर ,कर्नाटक या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.

त्याच्यावर सोलापूर शहर आणि ग्रामीण तसेच पुण्यात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या पथकाने केली आहे.