आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर फसवणूक:इलेक्ट्रिक दुचाकी एथर कंपनीचे डीलरशिप देण्याच्या बहण्याने 21 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला अज्ञात मोबाईल धारकांनी फोन करून येथे एथर एनर्जी इलेक्ट्रिक बाइक डीलरशिप देतो असे सांगून, 21 लाख 30 हजार रुपये भरण्यास सांगत त्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याबाबत सचिन साहेबराव भांडवलकर (वय 43,हडपसर, पुणे) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 1 एप्रिल 2023 ते 26 एप्रिल 2023 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन भांडवलकर यांना अज्ञात मोबाईल धारकांनी फोन करून एथर एनर्जी कंपनीकडून बोलत आहे असे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. एथर एनर्जी या कंपनीचा इलेक्ट्रिक डीलर डॉट कॉम हा अधिकृत ई-मेल आयडी असल्याचे भासवले.

एथर एनर्जी इलेक्ट्रिक बाइक डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला मदत करतो असे सांगून सदर आरोपीने एथर एनर्जी या कंपनीच्या डीलरशिपसाठी एकूण 21 लाख 30 हजार रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडून त्यांना कोणतीही डीलरशिप न देता तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता, आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे एस डगळे पुढील तपास करत आहे.

होलसेल मध्ये लॅपटॉप देण्याच्या बहण्याने फसवणूक

गंगाधाम सोसायटी याठिकाणी राहणाऱ्या कुणाल विजय शाह (33) यांना मनोज चौरसिया (राहणार जयपूर) या मोबाईल धारकाने फोन करून विश्वास संपादन करत, लॅपटॉपच्या होलसेल व्यवसाय करण्यासाठी स्वस्तात लॅपटॉप देतो असे आमिष दाखवले. त्याकरीता साडेचार लाख रुपये घेऊन सदर लॅपटॉप न पाठवता फसवणूक करण्यात आली.

शाह यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता, आरोपीने 64 हजार रुपये ऑनलाईन पाठवून उर्वरित रक्कम एक महिन्याच्या आत परत करण्याचे आश्वासन दिले आणि तीन लाख 90 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.