आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकाऱ्यांनी गिरवले व्यसनमुक्तीचे धडे:व्यसनाबाबत जागृती केल्यास गुन्हेगारीला बसेल आळा - मुक्ता पुणतांबेकर

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यसनासंदर्भात जनजागृती करण्याच्या कार्यात पोलिस दल देखील सहभागी झाल्यास व्यसन जन जागृती बरोबर त्या संदर्भाने होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांसाठी एकदिवसीय व्यसन जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर बोलत होत्या. 'व्यसन एक सामाजिक प्रश्न' या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, मुक्तांगण मित्र आणि मॅरेथॉनपटू राहुल जाधव उपस्थित होते.

डॉ. पुणतांबेकर म्हणाल्या की, व्यसनाधीनता हा एक गंभीर सामाजिक प्रश्न झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या संदर्भात केलेल्या मार्गदर्शनानुसार व्यसनाधीनतेच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे व्यसनांची उपलब्धता कमी करणे आणि दुसरे म्हणजे ज्यांना व्यसन लागले आहे अशा व्यक्तींची व्यसन करण्याची गरज कमी करणे. या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्यांना व्यसन आहे अशा व्यक्तींची व्यसन करण्याची गरज कमी करण्यासंदर्भात मुक्तांगणमध्ये काम केले जाते. तर पोलिस दल हे व्यसनांची उपलब्धता कमी करण्यासंदर्भात महत्त्वाचे काम करीत आहे.

पोलिस दल आणि मुक्तांगण या दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे काम करू शकल्या तर व्यसनाचा गंभीर प्रश्न समाजात आणखी वाढू नये यासाठी निश्चितपणे ठोस कृती कार्यक्रम करणे शक्य होईल. व्यसन हा आजार असून हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक स्वरूपात देखील काम करता येते, असा विश्वास मुक्तांगणला आहे. व्यसनांविषयी योग्य माहिती मिळाल्यास मुलांमध्ये व्यसनाबद्दल उत्सुकता निर्माण होणार नाही आणि त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे सहज शक्य होईल.

सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या की, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोेहीमे अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्टी परिसरात ज्या ठिकाणी व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे, त्याठिकाणी जाऊन पोलिस अधिकारी जनजागृती करणार आहेत. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...