आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:निवृत्त सुभेदाराची सायबर गुन्हेगारांकडून एक कोटींची फसवणूक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या एका सुभेदारास सायबर चोरट्यांनी ऑनलाईन एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

याबाबत निवृत्त सुभेदाराने अनोळखी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.संबंधित सायबर चोरट्यांनी निवृत्त सुभेदारास मेसेज पाठविला होता. समाजमाध्यमावर प्रसारित होणाऱ्या जाहीराती तसेच ध्वनीचित्रफितीला दर्शक पसंती (लाइक्स) दिल्यास त्यात अल्पावधीत मोठा नफा मिळेल. प्रत्येक दर्शक पसंतीला पैसे देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला आरोपींनी तक्रारदार निवृत्त सुभेदारास काही रक्कम बँक खात्यात दिली.विश्वास संपादन झाल्यावर त्यानंतर आणखी नफा मिळवण्यासाठी तक्रारदार सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडले.

या व्यवसायात गुंतवणूक केल्यास 10 ते 20 टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतले. सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी विविध कारणे सांगत पैसे उकळले. तुम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले. निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये वेळोवेळी जमा केले. त्यांनी नातेवाईकांकडून काही रक्कम उधारीवर घेतली होती. ही रक्कम ही त्यांनी चोरट्यांना दिली.

मात्र, त्यांना कोणताही परतावा आरोपींकडून देण्यात आला नाही किंवा गुंतवणूक रक्कम परत केली गेली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. चोरट्यांनी पाच बँकातील 12 खात्यात संबंधित पैसे जमा करुन घेतले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.याप्रकरणी पोलिस निरीक्षक एस सावंत पुढील तपास करत आहेत.