आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास कामे:पुणे-औरंगाबाद महामार्ग सहापदरी करणार, पुणे ते शिरूरदरम्यान डबल डेकर पुलाची निर्मिती; नितीन गडकरी यांची माहिती

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 हजार कोटींचा देहू-आळंदी ते पंढरपूर ‘भक्तिमार्ग’ करणार

पुणे-औरंगाबाद रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि त्यामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी हा महामार्ग सहापदरी करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर पुणे शहर-उपनगरातून बाहेर जाताना होणारा खोळंबा लक्षात घेता पुणे ते शिरूर हा ४७ किलोमीटरचा मार्ग डबल डेकर १२ पदरी करण्यात येणार आहे. त्याचे काम पुढील सहा महिन्यांतच सुरू करण्याचे लक्ष्य असून त्यानंतर पुणे-औरंगाबाद हा सहापदरी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न राहील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

मुंबई-बंगळुरू रस्त्यावरील पुण्यातील चांदणी चाैक येथील रस्ता विकास कामाची पाहणी गडकरी यांनी शनिवारी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील विविध रस्त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबतही माहिती दिली. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापाैर मुरलीधर माेहाेळ उपस्थित हाेते. देहू-आळंदी ते पंढरपूरदरम्यानचा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १२ हजार काेटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येत आहे. हा मार्ग आध्यात्मिक, भक्तिमार्ग व्हावा अशी इच्छा आहे. माझ्या जीवनातील हे दाेन महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत, असे गडकरी म्हणाले.

मुंबई-पुणे महामार्गाला सुरत येथून बाह्यवळण, नाशिक-नगर-सोलापुरातून थेट दक्षिणेत :

गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या सर्व गाड्या या मुंबई-पुणे मार्गे जात असल्याने प्रचंड वाहनांची गर्दी संबंधित ठिकाणचे रस्त्यावर हाेते, ही वाहनांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सुरत येथून बाह्यवळण रस्ता काढून ताे नाशिक-अहमदनगर-साेलापूर मार्गे थेट कर्नाटक, तामिळनाडू, केरळला जाऊ शकेल असे नियाेजन आहे. याकरिता भूसंपादन कारवाई सुरू झाली असून सुमारे २५ हजार काेटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. उत्तराखंड येथून मानस सराेवराला वर्षभर जाता यावे याकरिता रस्ता विकसित करण्यात येत असून त्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगाेत्री, यमुनाेत्री या चारधामला वर्षभर भाविकांना जाता येऊ शकेल याकरिता १२ हजार काेटी रुपये खर्चून रस्ता विकसित करण्याचे काम यंदाच्या वर्षी पूर्ण हाेईल. दिल्ली ते मुंबईदरम्यान एक लाख काेटी रुपये खर्च करून आठपदरी रस्ता विकसित करण्यात येत असून या दाेन शहरांत १२ ते १३ तासांत कारने प्रवास करता येऊ शकेल.

पंढरपूर रस्त्याच्या पादचारी मार्गावर गवत

संतांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता देहू-आळंदी-पंढरपूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा संतांच्या अभंगातील झाडे दुतर्फा लावावीत, त्यांच्या आेवी, गाथा याची माहिती ठिकठिकाणी डिजिटल स्वरूपात प्रदर्शित करण्यात येतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे माध्यमातून दुतर्फा सुशाेभीकरण करण्यात येईल. अनेक वारकरी उन्हाळ्यातही अनवाणी पंढरपूरला जात असतात. त्यांची वारी सुखकर करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गावर टाइल्स लावून त्यावर गवत लावण्याचा प्रयत्न आहे, असे गडकरी म्हणाले.

जालना - नांदेड समृद्धी महामार्गाच्या डीपीआरचे काम सुरू : एकनाथ शिंदे

औरंगाबाद- जालना जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग जालना ते नांदेड मार्गाला जोडण्यात येणार असून आहे. त्यासाठी बांधकाम समितीने ५ हजार कोटींच्या खर्चास तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सध्या त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत दिली.

बातम्या आणखी आहेत...