आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंकताच अश्रू अनावर:शर्यतीत पडला, कारकिर्दीला ब्रेक लागला; संघर्षानंतर मोटो सुपरक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये ऋग्वेद बनला सर्वोत्तम रायडर

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथे झालेल्या एमआरएफ मोग्रिप सुपरक्रॉस चॅम्पियनशिप राउंड-१ बाइक शर्यतीत पुण्याच्या ऋग्वेद बारगुजेने बाजी मारली. या स्पर्धेत २२ वर्षीय ऋग्वेदने सर्वोत्तम ‘रायडर’चा मान मिळवला आहे.

क्लास-१, एसएक्स-१ प्रकारात पेट्रोनास टीव्हीएस रेसिंगचा स्टार रायडर ऋग्वेदने १७, २०, ३७ गुण मिळवून बाजी मारली. त्याने व्ही. प्रज्ज्वलला (२०, १५, ३५ गुण) मागे टाकले. पहिल्या टप्प्यात गतविजेत्या ऋग्वेदने जबरदस्त सुरुवात केली. शर्यतीत तो आघाडीवर होता. मात्र, अखेरच्या ‘लॅप’मध्ये त्याला हातांमध्ये ताण जाणवायला लागला. त्यामुळे त्याला वेगात सातत्य राखता आले नाही.

प्रज्ज्वलने त्याच्यासमोर चांगले आव्हान निर्माण केले होते. यामुळे पहिल्या टप्प्यात तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. डॉ. सुदीप कोटेगर हे त्याच्या मदतीला धावून गेले. त्यांनी हाताला थोडा मसाज दिला आणि तात्पुरता इलाज करून ऋग्वेद पुन्हा शर्यतीत सहभागी झाला. दुसऱ्या टप्प्याच्या शर्यतीत मात्र ऋग्वेदने शेवटपर्यंत आघाडी गमावली नाही. यात त्याने आपले कौशल्य दाखवून दिले.

ऋग्वेद ज्ञानेश्वर बारगुजेने २०१२ पासून रेसिंगला सुरुवात केली. तो पहिल्याच शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हे बक्षीस त्याचा आत्मविश्वास उंचावणारे आणि पुढील दिशा निश्चित करणारे ठरले. यानंतर ऋग्वेदने सरावावर भर दिला. याचे फळ त्याला २०१५ मध्ये मिळाले. तो श्रीलंका ज्युनियर चॅम्पियनशिप आणि इंडियन ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला. यात त्याने बाजी मारली. येथून त्याच्या कारकिर्दीने वेग पकडला. २०१६ मध्ये ऋग्वेद एसएक्स-२ प्रकारात एमआरएफ प्राइव्हेट फॉरेन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला. यात त्याने जेतेपद पटकावले.

यानंतर २०१७ मध्ये त्याने एसएक्स-१ डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. या स्पर्धेतूनही तो करंडक मायदेशी घेऊन आला. प्रगतीचा आलेख चढता असताना, त्याच्या कारकिर्दीला अचानक ‘ब्रेक’ लागला. त्याला २०१८ मधील शर्यतीत अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे रेसिंगपासून तो दोन वर्षे बाजूला पडला. यातून सावरत नाही, तोच करोनो संसर्गामुळे सारे क्रीडा विश्व ठप्प झाले. यामुळे त्याचे पुनरागमन लांबले. अर्थात, यामुळे तो निराश झाला नाही. मात्र, संसर्ग कमी झाल्यानंतर त्याला सरावाला परवानगी मिळाली, आणि त्याने सरावाला सुरुवात केली.

अखेर २०२२ मध्ये त्याने एमआरएफ एसएक्स-१ इंडियन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये बाजी मारली. या वेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याने दाखविलेला संयम कामी आला होता. त्याच्या या यशामुळे तब्बल २१ वर्षांनंतर या शर्यतीत महाराष्ट्राला जेतेपद मिळाले होते.