आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी?:मला काहीच अडचण नाही, निर्णय झाल्यास आनंदच - भाजपचे विद्यमान खा. गिरीश बापट

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिल्यास मला काहीच अडचण नाही, असे वक्तव्य पुण्याचे विद्यमान भाजप खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. त्यामुळे येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

खा. गिरीश बापट म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवल्यास मला आनंदच होईल. मात्र, एखादी संघटना राजकीय पक्षाचे निवडणूक उमेदवार ठरवत असतील तर समस्या निर्माण होईल. राजकीय पक्षात निवडणुकीसाठी उमेदवारी देणे, हे नेत्यांचे काम असते. पक्षांमध्ये उमेदवार ठरवण्याची यंत्रणा असते. त्यासाठी अध्यक्ष, निवडणूक मंडळ असते. संघटना फार फार तर एखाद्या उमेदवाराचा प्रचार करु शकता. मात्र, फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिल्यास मला काहीच अडचण नाही. उलट या निर्णयाचा मला आनंदच होईल.

ब्राह्मण महासंघाची नड्डांकडे मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात महासंघाने म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. फडणवीस भाजपचे भविष्य आहे. भाजपला सक्षम नेतृत्व देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास आहे. भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पत्रात व्यक्त केली आहे.

फडणवीस दिल्लीला जाणार?

संसदीय मं‌डळ या आपल्या सर्वोच्च धोरण निर्धारक समितीत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलून देवेंद्र फडणवीसांना स्थान दिले आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशा स्थितीतच ब्राह्मण महासंघाने फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारीची मागणी करत या शक्यतेला आणखी बळ दिले. तर, आता पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीदेखील फडणवीसांना उमेदवारी देण्यास आपली काहीच अडचण नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...