आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:7 लाखांची उधारी, बदल्यात दुप्पट किमतीसह तीन खोल्यांचा ताबा घेतला; सावकारावर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उधार घेतलेल्या सात लाखांच्या बदल्यात 13 लाख 81 हजार रुपयांची परतफेड करून आणखी दोन लाख रुपयांची आणि तीन खोल्यांच्या ताब्याची मागणी करणाऱ्या सावकारांवर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली असून नाना कुदळे आणि गणेश उर्फ मंगेश दिघे अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत 32 वर्षीय तक्रारदार याने पोलिसांकडे फिर्याद दखल केली आहे.सदरचा प्रकार 16 एप्रिल 2022 ते 30 मार्च 2023 यादरम्यान घडला आहे.तक्रारदारने व्यक्तिगत कामासाठी आरोपी गणेश दिघे याच्याकडून सुरवातीला पाच लाख रुपये 10 टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात दोन खोल्यांचे गहाण खत केले गेले. आरोपी नाना कुदळे याचे पाच लाख रुपये गणेशच्या मध्यस्थीने तक्रारदारास दिले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे पुन्हा 2 लाखांची मागणी केली.

आरोपींनी फिर्यादीकडून पुन्हा होस्टेलची 1 खोली गहाण ठेवुन घेत एकूण 7 लाख रुपये 10 टक्के व्याजाने दिले होते. दरम्यान, काही महिन्यांनी फिर्यादींनी आरोपींना मुद्दल, व्याज व व्याजावरील दंडव्याज मिळून 13 लाख 81 हजार रुपये परतफेड केली. तरीही आरोपींनी संबंधित तक्रारदारास ३ खोल्यांचा ताबा आणि आणखी दोन लाख रुपये न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हॉस्टेलमधील सीसीटीव्ही, साऊंडची तोडफोड केली.

पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबत तक्रारीची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे यांच्या पथकाने आरोपी नाना कुदळे, मंगेश दिघे यांना अटक केली. आरोपी नाना बाळु कुदळे सराईत असून त्याच्याविरुद्ध मोक्का, खून, खूनाचा प्रयत्न याबाबत गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, एपीआय चांगदेव सजगणे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, अनिल मेंगडे, पवन भोसले, मारोती नलवाड यांनी केली आहे.