आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Cm Shinde Visit Today | Eknath Shinde Garden Update Pune | Inauguration Ceremony Of 'Eknath Shinde' Park Cancelled; Complaint That Naming Is Illegal

पुण्यात येण्याआधीच मुख्यमंत्र्यांवर नामुष्की:'एकनाथ शिंदे' उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द; नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर एक उद्घाटन सोहळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. शिंदे यांच्या हस्ते पुण्यात होणाऱ्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर एक संबंधित उद्यान तयार करण्यात आले आहे. त्याला शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी त्या उद्यानाला 'एकनाथ शिंदे' यांचे नाव दिले होते. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा सर्व खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असाही त्यांनी दावा केला होता.

महापालिकेलाही ठेवले अंधारात

उद्यानाच्या या नामकरणाला अद्याप शासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार काही स्वयंसेवी संघटनांनी केली होती. तसेच या कार्यक्रमात महापालिकेलाही अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील अकारण होणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने उद्घाटन कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती आहे.

शिंदे- ठाकरे आमने सामने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या तोफा आज पुण्यात धडाडणार आहेत. एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांबाबतचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, शिवसेनेचे नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही संध्याकाळी कात्रज चौकात जाहीर सभा होणार आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय तोफा धडाडणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते 1.20 दरम्यान फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 2.15 ला ते श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे जातील. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता सासवड पालखी तळ मैदानावर शिवसेना पक्षाची जाहीर सभा होणार आहे. सध्या देशातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू आहे. त्यामुळे शिंदेंची तोफ कोणावर डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...