आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी चालली आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी सुरू झाली आहे. शुक्रवारी पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचे 1 किलो कोकेन जप्त केले आहे. आतापर्यन्तची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या प्रकरणी एका नायजेरीयन तरुणाला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
अब्दुल अझीज अन्डोई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता व सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांबाबत माहिती काढून कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेगळे, शैलजा जानकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री, कोंढवा पोलीस ठाण्यांतर्गत गस्तीवर असतांना मोठ्या प्रमाणात कोकेन विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली.
आरोपी फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई उंड्री मंतरवाडी परिसरात आर पॉईन्ट सोसायटीच्या समोर हा त्याच्या कारमध्ये बसला होता. दरम्यान, त्याची ओळख पटवून त्याच्यावर पथकाने कारवाई केली. त्याला अटक करून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 2 कोटी 20 लाख 8000 रुपयांचे 1 किलो 81 ग्रॅम कोकेन सापडले.
पोलिसांनी या कोकेनसह सहा मोबाईल फोन, एक कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले. तसेच आरोपीवर एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम 8 (क). 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापुर्वी चुतश्रृंगी पोलीस ठाणे येथे कोकेन या अंमली पदार्थाचे तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल असुन नुकताच तो येरवाडा कारागृहातून जामीनावर मुक्त झाला होता. तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याचेवर यापुर्वी कारवाई केली होती.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.