आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना 'बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड' या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले.
दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते.
यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना 'मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही', अशी आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील 80 लाख मतदारांना शुभेच्छा देतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली.
गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले.
17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी 25 नोव्हेंबर आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी 442 महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून 48 हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.