आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात कंटेनर उलटला:काही क्षणांतच पेट घेतल्याने घाबरून एकाने पुलावरून मारली उडी, तातडीच्या मदतीमुळे दोघे बचावले

पुणे | प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंटनेरमध्ये अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाने बाहेर काढले. - Divya Marathi
कंटनेरमध्ये अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाने बाहेर काढले.

पुण्यात अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाही. नवले पुलाआधी असणाऱ्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर मंगळवारी पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास कंटेनर पलटी झाला.

अपघातात कंटेनर चालक हा अडकून पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एक दुचाकीस्वार थांबला. मात्र, कंटेनरने पेट घेतल्याने घाबरलेल्या अवस्थेत पूलाखाली दुचाकीस्वाराने उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात कंटेनर चालकाला आणि दरी पूलावरून उडी मारलेल्या व्यक्तीला वाचवले.

चालकाचे नियंत्रण सुटले

जांभुळवाडी येथील दरी पूलावर मध्यरात्री ३.३० च्या सुमारास एका भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाला. अपघातात चालक का कंटेनरमध्ये अडकून पडला. दरम्यान, रस्त्यावर पलटी झालेला ट्रेलर पाहून एक दुचाकीस्वार मदतीकरिता पुढे आला. तेव्हा ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेतल्याचे पाहताच मदतीसाठी पुढे आलेल्या दुचाकीस्वाराने घाबरुन स्वत:चा बचाव करण्याकरिता दरी पुलावरुन खाली उडी मारली

कंटेनरमध्ये अडकलेला चालक.
कंटेनरमध्ये अडकलेला चालक.

जवानांनी बचावले

घटनेची माहिती मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवान पोहोचताच जवानांना मोठा ट्रेलर पलटी होऊन पुढील केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला असल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाशी संवाद साधून त्याला धीर देत जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने स्प्रेडर व कटर हे उपकरण वापरत तसेच एका क्रेनच्या मदतीच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्याला उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

काही काळ वाहतूक कोंडी

दरम्यान, दरी पुलावरून उडी मारलेल्या नागरिकांचा मदतीसाठी ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने दुचाकीस्वारासही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले. अपघाताचे नेमके कारण व दोन ही जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून रस्ता स्वच्छ केला. आपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी ती काही वेळात दूर केली.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल - शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवानही मदतीकरिता दाखल झाले होते. पोलिस विभाग व उपस्थित असणारे नागरिक यांचीही मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...