आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हायटेक:होम क्वाॅरंटाइन व्यक्ती घराबाहेर पडल्यास लगेच फोनवरून ताकीद, पुण्यातील होम क्वाॅरंटाइनवर कोविड वॉररूमची करडी 'नजर’

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉररूममध्ये मार्गदर्शन करताना अधिकारी वर्ग.
  • वॉरियर्स स्वत:च्या सुरक्षेबाबतही सजग, वॉररूममुळे मिळतोय तत्पर डेटा
Advertisement
Advertisement

हॅलाे, आज तुमच्या रुग्णालयात किती नमुने घेण्यात आले?

नमस्कार, आज तुमच्याकडील किती जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले?

हॅलो, रुग्णांना नाष्टा, जेवण किती वाजता देण्यात आले? किती बेड्स उपलब्ध आहेत?

हॅलो, आज किती डॉक्टर्स उपस्थित होते, किती नर्सेस ड्यूटीवर होत्या? यासारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती पुणे स्मार्ट सिटीच्या कोविड वॉररूममधून सुरू होती. शहरातील सर्व कोविड हॉस्पिटल्स, क्वाॅरंटाइन कक्ष यांच्याशी संपर्क करून मिनिटा मिनिटाची माहिती अपडेट केली जात होती. विशेष म्हणजे, होम क्वाॅरंटाइन असलेली एखादी व्यक्ती घराबाहेर पडली तर तिलाही लगेचच फोन करून सक्त ताकीद दिली जात होती.

हे दृश्य आहे, दहा हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार केलेल्या पुणे शहरातील कोविड वॉर रूमचा. गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यातील रुग्ण, त्यांची व्यवस्था, चाचण्या, खासगी व शासकीय रुग्णालयातील व्यवस्था, डॉक्टर्स आणि नर्सेसची उपलब्धता आणि महत्त्वाचे म्हणजे होम क्वाॅरंटाइन असलेल्या रुग्णांचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग येथून केले जात आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खास डॅशबाेर्डची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून शहरातील कंटनेमेंट झाेन, हाॅटस्पाॅट नजरेच्या एका टप्प्यात समजण्यास मदत हाेत आहे.

सध्या इथे २५-३० कर्मचारी २४ तास सेवा बजावताहेत. मिनिटा मिनिटाची माहिती डॅशबाेर्ड प्रणालीचा वापर करून एकत्रित संकलित केली जात आहे. त्यामुळे काेणत्या भागात रुग्ण सापडले, त्यांना काेणती लक्षणे दिसत हाेती, त्यांना इतर आजार आहेत का, त्यांचा वयाेगट काय, त्यांचे नाव- पत्ता काय, त्यांच्या संपर्कात काेण-काेण आले, संपर्कातील व्यक्तींची तपासणी झाली का, दरराेज किती स्वॅब घेतले जातात, किती नमुन्यांचे अहवाल प्रयाेगशाळेकडून आले, किती रुग्ण पाॅझिटिव्ह, किती रुग्ण निगेटिव्ह, रुग्णालयांची पायाभूत सुविधा कशा प्रकारची, रुग्णालयात किती बेडची संख्या आवश्यक अशा प्रकारची वेगवेगळ्या माहितीचे संकलन करून ती डॅशबाेर्डवर अपडेट केली जाते. शहरातील प्राथमिक आराेग्य केंद्रात दरराेज किती तपासणी हाेत आहे आणि काेराेनाची लक्षणे आढळून आलेल्या लाेकांना जवळच्या काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे का, याची माहिती आराेग्य विभागाच्या मदतीने वाॅर्डनिहाय घेऊन ती सुद्धा डॅशबाेर्डवर अपडेट करण्याचे किचकट काम इथे रात्रंदिवस सुरू आहे.

बऱ्या झालेल्या रुग्णांना नंतरचे १४ दिवस क्वॉरंटाइन करण्यात येते. मात्र, हा नियम पाळला जात आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम या वॉर रूममधून होते. त्यासाठी रुग्णांचे माेबाइल क्रमांक जीपीएसच्या साहाय्याने ट्रॅक केले जातात. त्यामुळे त्यांनी निवासस्थान साेडले तर लगेचच त्याची माहिती कंट्राेल रूममध्ये समजते आणि कंट्राेल रूम मधून संबंधित व्यक्तीला फाेन करून समज देण्यात येते.

वॉरियर्स स्वत:च्या सुरक्षेबाबतही सजग

चोवीस तास कोरोना वॉररूममध्ये काम करणारे हे वॉरियर्स स्वत:च्या सुरक्षेबाबतही सजग आहेत. या ठिकाणी काम करणारे अभिजित दिवंगुणे म्हणतात, मागील दाेन महिन्यांपासून काेराेना वाॅररूममध्ये अनेक जण काम करतात; परंतु आवश्यक ती खबरदारी सर्वजण बाळगत असल्याने अद्याप आमच्याकडे काेराेना रुग्ण मिळाला नाही. आवश्यक काळजी सर्वांनी घेतली तर शहर लवकरच काेराेनामुक्त हाेऊ शकेल.

वॉररूममुळे तत्पर डेटा मिळाला

तत्पर माहिती मिळाल्यामुळे शहरातील कंटनेमेंट झाेनची संख्या १५० वरून ६९ पर्यंत खाली आली असून शहराचा ९७ टक्के भाग पूर्ववत करण्यास मदत झाली आहे. साहजिकच पाेलिस आणि प्रशासनावरील ताण कमी हाेत आहे. कंटेनमेंट झाेनमध्ये मनपाच्या माध्यमातून काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असून संबंधित भागात वारंवार सर्वेक्षण केले जात असल्याने काेराेनाबाधितांचे निदान लवकर हाेऊन उपचार करणे शक्य हाेत आहे. - रुबल अग्रवाल, सीईओ, स्मार्ट सिटी, पुणे.

रुग्णाचे लोकेशन समजते

मी सकाळी पालिकेच्या रुग्णालयात काम करून दुपारनंतर कंट्रोल रूममध्ये काम करतो. डॅशबाेर्डमुळे शहराच्या नेमक्या काेणत्या भागात रुग्णसंख्या वाढते हे समजते. डॅशबाेर्डमध्ये हीटमॅप तंत्रज्ञानामुळे रुग्णांचे लाेकेशन समजल्याने नियोजन सोपे होते. - डॉ संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी.

Advertisement
0