आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवीच्या मुलाचा करंट लागून मृत्यू:पुण्यातल्या वडगाव धायरी परिसरातील घटना; घरातील पाण्याची मोटार सुरू करताना शॉक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वडगाव धायरी परिसरात एका 14 वर्षीय मुलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव रोहिदास निवगुणे (रा. धायरी, पुणे) असे मृत मुलाचे नाव आहे.

निवृत्ती नगर चळवळ वस्ती याठिकाणी राहणारा प्रणव घरातील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला असता शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कशी घडली घटना?

प्रणवचे वडील रोहिदास निवगुणे हे रिक्षाचालक म्हणून काम करतात तर आई गृहणी आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरातील काशीनाथ खुटवड मेमोरियल स्कूल या शाळेत प्रणव इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नळाला पाणी आल्याने, घरातील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी तो गेला होता. यावेळी पाण्याची मोटर चालू करताना त्याचा करंट लोखंडी जिन्यास लागून तो बेशुद्ध पडला आणि यातच तो मृत्युमुखी पडला.

उपचारापूर्वीच मृत्यू

घरातल्या व्यक्तींनी बराच वेळ होऊन प्रणव मोटार सुरू करून का परतला नाही हे पाहण्यासाठी गेले असता तो निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सिंहगड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रणव याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे.

दुचाकीस्वार ठार

टोईंग टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकस्वार तरुण ठार झाला आहे. हा अपघात एक सप्टेंबरला दुपारी पावणेदोनच्या सुमारास भैरोबानाला पोलीस चौकीसमोर घडला आहे. दरम्यान, टेम्पोला टोईंग करण्याचा परवाना नसतानाही चालकाने टोईंग केल्याचे उघडकीस आले आहे. यशराज चंद्रशेखर जाधव (वय २१ रा. मुंढवा ) असे ठार झालेल्या दुचाचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत जाधव (वय २२) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

परवानगीविना टोईंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज हे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीवरून भैरोबानाला पोलिस चौकी परिसरातून जात होते. त्यावेळी भरधाव टेम्पो टोईंग चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या यशराजचा मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित टेम्पो चालकाकडे टोईंगसाठी कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनालिका साठे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...