आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:परदेशी नागरिकाकडून साडेचार लाख रुपये किमतीचे कोकेन अमली पदार्थ पोलिसांकडून जप्त

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाणेर येथील अश्वमेध हाऊस, युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका संशयित परदेशी नागरिकास पकडले आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चार लाख 48 हजार रुपये किमतीचे 22 ग्रॅम 40 मिलिग्रॅम कोकेन, एक मोटार सायकल, 54 हजार रुपये रोख आणि चार मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख 69 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ट्रोवर बेंजामिन नोह ( वय -४३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा दक्षिण आफ्रिका येथील रहिवासी आहे.पुण्यातील बाणेर सुस भागात मागील तीन वर्षापासून तो राहत आहे.

अंमली पदार्थाची विक्री

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ अमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कारवाई करत होते. त्यावेळी पोलिसांना चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक परदेशी नागरिक हा त्याच्या ओळखीच्या लोकांना कोकेन आमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

सापळा रचून घेतली झडती

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून 43 वर्षीय परदेशी नागरिकास ताब्यात घेतली. त्याच्या झडती दरम्यान त्याच्याकडे कोकेन हा अमली पदार्थ मिळून आल्याने त्याच्या विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलिस अमलदार सचिन माळवे यांनी चतुर्शिंगी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार ,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.