आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात एका व्यावसायिक दांपत्याने हॉटेल चालवण्यासाठी उधारीवर दूध, भाजीपाला व किराणा घेऊन तब्बल 73 लाख 66 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली.
शाैकत अली खान, रेणुरतन शाैकतअली खान (रा. खराडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत व्यावसायिक अवधेश कुमार रामलुलारक उपाध्याय (वय-३९,रा.मुंढवा, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2016 वर्षांपासून डिसेंबर 2022 पर्यंत घडली आहे.
याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, आराेपी शाैकत अली खान व रेणुरतन खान यांची हिंजवडी, औंध, खराडी, मगरपट्टा- हडपसर या ठिकाणी स्काय हाय, स्काय फ्लाय नावाची तीन ते चार हाॅटेल आहेत. या हॉटेलकरता या दाम्पत्याने वेगवेगळया व्यावसायिकांकडून सामान उधारीवर घेतले. उधारीचे पैसे वेळाेवेळी पैसे परत करू असे सांगून पैसे न देता फसवणुक केली आहे. सदर जाेडप्याचा पाेलिस शाेध घेत आहेत.
व्यावसायिकांना गंडा
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शाैकत खान व त्यांची पत्नी रेणुरतन खान यांनी हाॅटेल चालविण्याकरता तक्रारदार अवधेश कुमार उपाध्याय यांच्याकडून वेळाेवेळी दूध व दुधाचे पदार्थ उधारीवर नेले. ही उधारी न देता त्यांची 39 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
सिमरजित जसबिरसिंग अराेरा (वय-29) यांच्याकडून काेळसा घेऊन त्यांची 6 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अश्विन अनिल परदेशी (वय-40) यांच्याकडून मासे घेऊन त्यांची 6 लाख 82 हजार 800 रुपयांची फसवणूक केली गेली. विजय कृष्णा शिवले (36 ,रा. गणेश पेठ, पुणे) यांना भाजीपाला घेऊन त्यांची 19 लाख 23 हजार 772 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
किराणा मालाची उधारी
श्रीकांत विजय कापसे (40,रा.महंमदवाडी,, पुणे) यांचेकडून एक लाख 74 हजार रुपयांचा किराणा घेऊन त्यांची ही फसवणूक आराेपींनी केली आहे. अशाप्रकारे विविध व्यवसायिकांकडून एकूण 73 लाख 66 हजार रुपयांचा माल घेऊन आराेपींनी त्यांचे पैसे न देता आर्थिक फसवणुक केलेली आहे. याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस खांडेकर पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.