आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:माजी नगरसेवकाच्या मुलाकडून किशोर आवारेंचा खून, वडिलांच्या कानशिलात मारल्याचा घेतला बदला

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील उद्योजक आणि जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, वडिलांच्या कानाखाली मारल्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी किशोर आवारे यांचा माजी नगरसेवकांच्या मुलानी कट रचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी गौरव चंद्रभान खळदे ( वय - २९)या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

नक्की प्रकरण काय?

गौरव खळदे हा सिविल इंजिनियर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. तर त्याचे वडील चंद्रभान खळदे आणि आई हेमलता खळदे हे दोघे माजी नगरसेवक आहेत. हेमलता खळदे या किशोर आवारे यांच्यासोबत जनसेवा विकास समिती माध्यमातून सुरुवातीला कार्यरत होत्या आणि त्याच माध्यमातून नगरसेवक पदावरही निवडून आलेले होत्या.

मात्र, त्यानंतर वैचारिक मतभेदांमुळे खळदे आणि आवारे यांच्यात अंतर निर्माण झाले होते. डिसेंबर 2022 मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांच्यात एका विषयावरून वाद झाला होता. त्यानंतर आवारे यांनी सर्वांसमक्ष चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली मारलेली होती. त्यामुळे हा राग गौरव खळदे यांच्या मनात होता. त्यातूनच गौरव याने जानेवारी 2023 पासून किशोर आवारे यांचा खून करण्याचा कट रचला. शाम निगडकर याच्या माध्यमातून इतर साथीदारांची जमवाजमाव करून खुनाचे नियोजन केले. त्यासाठी निगडकर यानी पिस्टल आणि शस्त्राची त्यांची व्यवस्था केली. तर गौरव याने सदर हल्लेखोरांना आर्थिक रसद पुरवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे.

आमदारानी समर्थकांचा मोर्चा रद्द

मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे ,श्याम निगडकर यांच्यासह तीन जणांवर खून आणि खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके समर्थकांनी रविवारी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते.

मात्र, पोलिसांनी आमदार समर्थकांना नोटीस देऊन, सदर मोर्चा कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काढता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे संबंधित मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी दिली आहे.