आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:दारूच्या नशेत गाड्या चोरून सोडून देणार्‍या सराईताला बेड्या - लष्कर पोलिस ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दारूच्या नशेत दुचाकी चोरून पेट्रोल संपेल तेथेच सोडून देणार्‍या सराईताला लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडील चौकशीत आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आठ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.

आसिफ अकबर शेख (वय -30, रा. भाग्योदयनगर, कोंढवा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सीसीटीव्हीतून चोरी उघड

पाटील यांनी सांगितले, लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेली असताना सीसीटीव्हीच्या आधारे लष्कर पोलिस ठाण्याचे पथक आरोपीचा माग काढत असताना त्यांना आरोपी हा कोढवा परिसरात असल्याचे समजले. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ह्या चोर्‍या दारूच्या नशेत केल्याचे सांगितले. त्याने लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या सहा गाड्या, कोंढव्यातून चोरलेल्या एका तर खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या एका गाडीची माहिती देताच ह्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

2015 आणि 2016 मध्ये देखील त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पाटील म्हणाल्या. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त आर राजे, वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अमंलदार महेश कदम, शिंदे, लोकश कदम, सागर हराळ, समीर तांबोळी, रमेश चौधर, किसन भारमळ, अतुल मेंगे, कैलास चव्हाण यांच्या पथकाने केली.