आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅट भाड्याने घेण्याचे सांगत घरमालकाचीच सव्वालाखांची फसवणूक:ऑनलाइन गैरव्यवहार करत 1 लाख 38 हजारास गंडवले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्य दलात अधिकारी पदावर काम करत असून आपल्याला पुण्यात कुटुंबासाठी फ्लॅट भाड्याने घ्यावयाचे असल्याचे एका भामट्याने घरमालकास फाेनवर सांगितले. त्यानंतर घरमालकास पैसे पाठविण्याचा बहाणा करून ऑनलाइन गैरव्यवहार करत घरमालकाला एक लाख 38 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत सागर वामन भुजबळ (वय-29, रा.लाेहगाव,पुणे) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात चार जणांविराेधात तक्रार दाखल केली आहे. कादीर (रा.गुलजारपूर, उत्तरप्रदेश), मल्लिका उज्जल बर्मन (रा.दुर्गापूर, पश्चिम बंगाल) व दाेन अनाेळखी बँक खातेधारक यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा 5/1/2022 राेजी घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सागर भुजबळ यांना त्यांचा लाेहगाव परिणातील फ्लॅट भाडे तत्वावर द्यावयाचा हाेता.

गुगल पे ने पैसे पाठवले

त्याकरिता त्यांनी ‘हाऊसिंग डॉटकॉम नाेब्राेकर डॉटकॉम’ या ऑनलाईन वेबसाईटवर फ्लॅट भाडयाने द्यावयाची जाहिरात अपलाेड केली हाेती. सदरची जाहिरात पाहून कादीर व मल्लिका बर्मन यांनी त्यांच्याशी माेबाईल क्रमांकावरुन संर्पक साधला. व्हॉटसअप कॉल करून आरोपींनी ते भारतीय सैन्य दलात काम करत असल्याचे सांगितले. फ्लॅटचे फोटो मागवून घेत त्यांनी आम्हाला फ्लॅट पसंत असून संबंधित फ्लॅट भाडेतत्वावर घ्यावयाचा असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे रक्कम आगाऊ देताे असे सांगुन त्यांनी तक्रारदार यांना त्यांचा खात्यावर गुगल पे या अॅप्लिकेशन द्वारे पैसे पाठवले असल्याची रिक्वेस्ट पाठवली.

आरोपींवर गुन्हा दाखल

त्यानंतर सदर आराेपींनी रिक्वेस्ट स्वीकारण्यास भाग पाडून व यूपीआय पासवर्ड टाकण्यास भाग पाडत त्यांच्या खात्यातून परस्पर एक लाख 38 हजार 990 रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार सागर भुजबळ यांनी याबाबत पुणे सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा घडल्याची खातरजमा करून विमानतळ पाेलिसांना याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे सांगितले. याप्रकरणी पुढील तपास येरवडा पाेलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...