आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेटा लीक प्रकरण:बँक अधिकाऱ्यांनीच केली डाॅरमंट खात्याची गाेपनीय माहिती लीक

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद येथील एचडीएफसी बँकेच्या एका शाखेतील अधिकाऱ्याने काेट्यवधी रुपये बँक खात्यात असलेल्या काॅर्पाेरेट कंपन्यांची गाेपनीय माहिती लीक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी हैदराबाद येथून लक्ष्मीनारायण गुट्टू (३२) आणि व्यंकटेश सुब्रमण्यम उपाला (४०) यांना पुणे पाेलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. बँक अधिकारी असलेल्या लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममिडी (३४, रा. हैदराबाद ) याच्या माेबाइलवरील व्हाॅट्सअॅपवर दाेन बँक खात्यांची माहिती पाठवली. त्यातील एका खात्यात २५ काेटी ७७ लाख ७८ हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यात तीन काेटी पाच लाख ६० हजार रुपये शिल्लक आहेत. दरम्यान, याप्रकरणी एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात हजार केले असता सर्व आरोपींना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोपनीय माहिती कशा प्रकारे प्राप्त करण्यात आली व त्यांना संबंधित बँकेतील अन्य कोणत्या कर्मचाऱ्यांनी मदत केली याबाबत पाेलिस तपास करत आहेत. अनघा माेडक हिच्या माेबाइल फाेनच्या माहितीचे एक्स्ट्रॅक्शन केले असता त्यातील संभाषणात सर्व आराेपींचा उल्लेख व त्यांच्याशी बाेलणे झाल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे सविस्तर स्क्रीट तयार करण्यात आली आहे. आराेपी राेहन मंकणी, अनघा माेडक, राजेश शर्मा व परमजित संधू हे १० ते १२ मार्चदरम्यान पुण्यातील नवी पेठेतील हाॅटेल सॅफराॅन येथे एकत्र आले. या वेळी त्यांनी बराच वेळ थांबून चर्चा केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे सदर हाॅटेलचे सीसीटीव्ही फुटेज व हाॅटेलमधील आॅर्डर देऊन मागणी केलेल्या खाद्यपदार्थांच्या बिलांच्या पावत्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. स्टाॅक ब्राेकर म्हणून काम करत असलेल्या अनघा माेडक हिच्या राहत्या घराच्या तसेच आॅफिसच्या झडतीत सात हार्डडिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित लॅपटाॅपचा वापर करण्यात आला आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे.

या गुन्ह्यात आयसीआयसीआय बँकेचे एक खाते व एचडीएफसी बँकेच्या तीन खात्यांबाबतची माहिती संबंधित बँकेने पाेलिसांना सादर केली आहे. सदर खात्यात २०९ काेटी रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली असून या खात्यातील पैसे आराेपी कोणत्या प्रकारे हॅक करून त्यातील रक्कम ही हीट जेम्स खात्याच्या आयसीआयसीआय बँक खात्याव्यतिरिक्त अन्य काेणत्या खात्यावर कशा प्रकारे ट्रान्सफर करणार हाेते याचा पाेलिसांना तपास करायचा असल्याचे सरकारी वकील डी. एल. माेरेंनी न्यायालयात सांगितले.

आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे
आराेपींच्या माेबाइल कॉलिंगचे टाॅवर लाेकेशन हे वेगवेगळया ठिकाणच्या लाेकेशनवर एकत्रितपणे सर्वजण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लातूर येथील आराेपी रवींद्र माशाळकर याच्या घरातून एक लॅपटाॅप जप्त करण्यात आला असून त्याद्वारे काही आॅनलाइन व्यवहार झाले आहेत का ? याची तपासणी करण्यात येत आहे. डाॅरमंट खात्याच्या गाेपनीय डेटाबाबत आराेपींकडे पाेलिसांनी विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असून पाेलिस तपासात सहकार्य करत नाहीत. आराेपी रवींद्र माशाळकर, मुकेश माेरे, आत्माराम कदम व वरुण वर्मा हे बँक खात्याची गाेपनीय डेटा स्टाेर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीत गुडगाव येथे नाेकरीला असल्याचे उघडकीस आलेले आहे. आरोपींच्या वतीने न्यायालयात अॅड. जितेंद्र गोराणे, ऋषिकेश गानू आणि एस. अगरवाल यांनी प्रतिवाद केला.

बातम्या आणखी आहेत...