आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune District Tops Performance Under Swachh Bharat Abhiyan | 5 Cities In The District Were Honored With First Rank In Various Categories

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्याची कामगिरी अव्वल:5 शहरांचा विविध श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक, पुरस्कार देऊन सन्मान

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2021-22 मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातील 5 शहरांनी विविध श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर संपन्न झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहर राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बारामती, लोणावळा, सासवड व इंदापूर नगरपालिकेस विविध श्रेणीमधील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद अर्थात फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी दिलेली लिंक ओपन करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी फिडबॅक नोंदवला असून योग्य उत्तरे दिल्याने शहराला देशामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.

बारामती नगरपरिषद देशात नववी

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषदेला देशात नववा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच 1 ते 3 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरांमध्ये वेगाने कामगिरी करणारे शहर म्हणून पुरस्कार मिळवला आहे. बारामती शहराने स्टार वन आणि वॉटर प्लस मानांकन मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सासवड नगरपालिका दुसऱ्या क्रमांकावर

सासवड नगरपालिका वेस्ट झोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून सेल्फ सस्टेनेबल सिटीचा बहुमान देश पातळीवर मिळाला आहे. इंडियन स्वच्छता लीगमध्ये 25 ते 50 हजार लोकसंख्येमध्ये देशपातळीवर अव्वल क्रमांक पटकावला आहे. सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लोणावळा नगरपालिका चौथा क्रमांकावर

लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी लोणावळा नगरपालिकेला देशपातळीवर चौथा क्रमांक तर वेस्ट झोन मध्ये सर्वात स्वच्छ शहर म्हणून मान मिळाला आहे. इंडियन स्वच्छता लीग मध्ये 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येमध्ये देश पातळीवर अव्वल क्रमांक मिळवला आहे. लोणावळाचे मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंदापूरला स्वच्छता लीगमध्ये विशेष बहुमान

इंडियन स्वच्छता लीग ही भारतातील पहिली आंतर-शहर स्पर्धा आहे ज्याचे नेतृत्व युवकांनी कचरामुक्त शहरे बनवण्याच्या दिशेने केले आहे. 17 सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांचे नियोजन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 'विशेष उल्लेखनीय गुणगौरव' या पुरस्काराने इंदापूर नगरपरिषदेचा गुणगौरव करण्यात आला. मुख्याधिकारी राम कापरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

बातम्या आणखी आहेत...