आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगार पतीला पत्नीकडूनच 50 हजारांची पोटगी:दोघांच्या सहमतीने न्यायालयाची घटस्फोटाला मंजूरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी नसलेल्या पतीला पत्नीने 50 हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य करत घटस्फोट घेतल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. पती-पत्नीने सहमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा हा दावा न्यायालयाने निकाली काढला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, उच्चशिक्षित जोडप्याचा 2018 मध्ये विवाह झाला होता. मात्र एकमेकांसोबत पटत नसल्याने दोघेही 2020 पासून विभक्त राहत होते. यापैकी पती हा बीटेक तर पत्नी एमटेक झालेली होती. पत्नी ही एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करते.

पत्नीचे पोटगीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र

पत्नीनेच पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर न्यायालयाने पोटगीचा आदेश दिला होता. मात्र पत्नीने पोटगीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे पतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत तक्रार केली. आपल्याला नोकरी नसल्याने पत्नीनेच पोटगी देण्याची मागणी पतीने केली. यानंतर न्यायालयाने तडजोडीने दावा निकाली काढण्याबाबत विचारणा केल्यावर दोघांनी त्याला तयारी दाखवली. तर पत्नीने पोटगी देण्यास सहमती दर्शवली.

या अटींवर घटस्फोट

  • लग्नात एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू परत कराव्या
  • पत्नीने पतीला एकरकमी 50 हजार रुपये पोटगी द्यावी
  • पत्नीने पोटगी मागण्याचा हक्क कायमस्वरूपी सोडून द्यावा
  • पतीने केलेली तक्रार व अपील मागे घ्यावे
  • एकमेकांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर हक्क सांगायचा नाही

सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी युक्तिवाद केला.