आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
|महिला रुग्णाला पोटात कॅन्सरची गाठ असल्याची थाप मारत महिला डॉक्टरने उपचाराच्या नावाखाली तब्बल १ कोटी ४८ लाख रुपये लाटल्याचा प्रकार गोळीबार मैदान परिसरात २०१७ ते डिसेंबर २०२० कालावधीत घडला.
डॉ. विद्या धनंजय गोंद्रस (रा. कोंडाई मारुती इमारत, वानवडी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुषमा जाधव (५८) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुषमा जाधव कंट्रोल ऑफ डिफेन्स अकाउंटमध्ये ऑडिटर आहेत. २०१७ मध्ये एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची डॉ. विद्या हिच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी सुषमा यांना अर्धशिशी आणि गुडखेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या कोंढवा बुद्रुकमधील डॉ. विद्या यांच्या दवाखान्यात गेल्या होत्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये सुषमा यांना चक्कर आल्यामुळे त्यांनी डॉ. विद्या यांचा सल्ला घेतला. त्यानंतर जून २०२० मध्ये जाधव यांनी डॉ. विद्या यांना फोन करून खाल्लेले अन्न नलिकेत अडकत असल्याचे सांगितले. तेव्हा डॉ. विद्याने त्यांना जानेवारी २०२० पासून दवाखाना बंद करून कॅनडातील आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक फ्रँचायझी घेतल्याचे सांगितले. त्या औषधांमुळे अनेकांना गुण आल्याने तिने सुषमाला सांगितले.
डॉक्टरची बँक खाती सील, तपास सुरू
फ्रँचायझी असल्याचे सांगत बाहेर देशातून कॅन्सरसाठी औषधे मागवावी लागतील, यासाठी उपचार घेणाऱ्या महिलेला बोलण्याने संमोहित करून व आजाराची भीती दाखवून १ कोटी ४७ लाख ५८ हजारांची डॉक्टर महिलेने फसवणूक केली. संबंधित आरोपीची दोन्हीही बँक खाती सील करण्यात आली असून तपास सुरू आहे. - भोलेनाथ अहिवळे, पोलिस उपनिरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे
असा घातला गंडा
डॉ. विद्याच्या सांगण्यानुसार सुषमाने नाभीचा फोटो काढून पाठवला. त्यानुसार डॉ. विद्याने सुषमाला लिव्हर असायटिस झाल्याचे सांगितले. तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ आहे, पोटात पाणी आहे, असे सांगत सुषमाला घाबरवले. त्यानंतर त्यांच्याकडून उपचारासाठी पैसे घेण्यास सुरुवात केली. उपचाराच्या बदल्यात वेगवेगळ्या गोळ्या दिल्या. डॉ. विद्याने सुषमा यांच्याकडून वेळोवेळी धनादेश, बँक खात्यात रक्कम वर्ग करून घेतली. मात्र, त्यांना आजारपणाची कोणतीही ठोस कागदपत्रे ताब्यात दिली नाहीत. कागदपत्रे मागितली असता डॉ. विद्या कॅन्सरचे फोटो दाखवून भीती घालत होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.