आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे नोट कांड:फसवणुकीसाठी बनावट नोटांचा वापर, लष्करातील लान्स नायकच सूत्रधार

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात 87 कोटी 5 लाख 75 हजार रुपयांच्या खोट्या नोटा जप्त

विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण ८७ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अटक आरोपींचे मोठे रॅकेट असून लष्करातील लान्स नायक हाच मुख्य सूत्रधार असल्याने खळबळ उडाली आहे. चलनाचा वापर आरोपीने फसवणुकीसाठी केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

जप्त करण्यात आलेली रक्कम मोठी असल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत तिची मोजदाद सुरू होती. शेख अलिम समद गुलाब खान (३६, रा. प्रतिकनगर, येरवडा,पुणे) असे या लान्स नाईकचे नाव असून तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी येथे कार्यरत आहे. त्याच्यासह सुनील बद्रीनारायण सारडा, अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान, अब्दुल रहेमान अब्दुलगणी खान, रितेश रत्नाकर आणि तुफेल अहमद महमद इशोक खान यांना अटक करण्यात आली आहे.

लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोकड, पाच मोबाइल, रोख २ लाख ८९ हजार रुपये, १ हजार २०० अमेरिकन डॉलर, चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १३ नोटा, एक कार आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये २ हजार, १ हजार, ५०० रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे नमूद केले आहे. ज्या बंगल्यात नोटा ठेवण्यात आल्या होत्या त्या बंगल्याच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. संबंधित नोटा बंगल्यात का ठेवल्या होत्या? या नोटांद्वारे व्यवहार करून आरोपींनी कोणाला फसवले आहे का? टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच मुख्य सूत्रधार खानचा या गुन्ह्यामागील उद्देश काय? याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची १५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

आरोपींनी तयार केले चलन देण्याचे व्हिडिओ

आरोपींनी स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखवणारे व्हिडिओ तयार केल्याची माहिती मिळाली आहे. हे व्हिडिओ ज्यांच्याकडे काळा पैसा आहे किंवा हवाला करणाऱ्यांना पाठवण्यात येणार होता. खोट्या नोटांच्या बंडलला खऱ्या नोटा लावून त्याद्वारे फसवणूक करण्यात येणार होती. त्यांनी काही लोकांची फसवणूक देखील केली असल्याचे समोर आले आहे. खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी याबाबत विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नोटा मुंबईतील भेंडी बाजारातून आणल्या

बनावट चलन मुंबईतील भेंडी बाजारातून आणले असून जप्त करण्यात आलेल्या नोटांचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी करणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. भेंडी बाजारात लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा मिळतात. काही नोटांवर ‘बच्चों का रिझर्व्ह बँक’ असे लिहिल्याचे आढळले आहे.

बातम्या आणखी आहेत...