आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालत:लोकन्यायालयात जुळाले वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार, पुण्यात 18 कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकन्यायालयात वर्षानुवर्षे दुभंगलेले संसार पुन्हा जोडले गेले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने रविवारी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात प्रलंबित 18 कौटुंबिक वाद प्रकरणे मध्यस्थीने निकाली काढण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस. सी. चांडक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांची उपस्थिती

या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील पक्षकारांनी व त्यांचे विधीज्ञ यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून तर काही पक्षकार व विधीज्ञ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावून आपले म्हणणे मांडले. त्यामध्ये महिला पक्षकारांची उपस्थिती लक्षणीय होती.

दुभंगलेले संसार जुळले

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात सुधीर जी. बरडे यांच्या विशेष मध्यस्थीने सात वर्षापासून दुभंगलेले संसार जुळले व मुलाबाळांपासून विभक्त राहत असलेले एकूण चार जोडपे एकत्र येऊन न्यायालयातूनच नांदावयास गेले.

उर्वरित इतर कौटुंबिक प्रकरणात एक रकमी कायमस्वरूपी पोटगीची रक्कम देऊन तडजोड करण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील पक्षकारांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्यांनी लोकन्यायालयाचे आभार मानले.

लोकन्यायालयात संसार जुळवून नांदावयास गेलेल्या कुटुंबीय व त्यांच्या अपत्यांना पॅनल प्रमुख सुधीर बरडे, पॅनल सदस्य ॲड. साळुंखे व सहायक अधीक्षक श्रीमती रीता क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.