आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानांच्या भांडणावरुन मालकांमध्ये जुंपली:पुण्यात श्वानाच्या पट्ट्याने एकास बेदम मारहाण

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वानांमध्ये झालेल्या भांडणातून श्वानांच्या मालकांमध्ये वादावादी झाली. वादावादीतून एकाला श्वानाच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार संदीप बोत्रे (वय 21, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार आणि प्रतीक श्वानाला फिरायला घेऊन बाहेर पडले होते. दोघांच्या श्वानांमध्ये भांडणे झाली. त्या वेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मी भांडणे सोडविणार नाही, असे ओंकारने त्याला सांगितले.या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून प्रतीकने श्वानाच्या चामडी पट्ट्याने ओंकारला बेदम मारहाण केली. ओंकारच्या डोक्यास दुखापत झाली. याबाबत पोलीस नाईक एस रायकर पुढील तपास करत आहेत.

तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

मित्रासोबत चाललेल्या तरूणाला अडवून तू नन्या मिसाळ याला विरोध करतोस, अशी विचारणा करून टोळक्याने तरुणाला रॉडने मारहाण करीत गंभीर जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्‍या मित्रालाही त्यांनी मारहाण केली. ही घटना 19 डिसेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास केशवनगरमध्ये घडली आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी राहूल उर्फ लल्ला कांबळे आणि स्वप्नील उर्फ नन्या मिसाळ यांच्यासह अनोळखीविरूद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुप ढगे (24, रा.म्हसोबा वस्ती, केशवनगर,पुणे ) असे जखमीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुप आणि त्यांचा मित्र 19 डिसेंबरला चहा पिउन रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी आलेल्या टोळक्याने अनुपला अडवून तू नन्या मिसाळ याला विरोध करतो, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली. अनुपला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याच्यावर रॉडने हल्ला करीत गंभीररित्या जखमी केले. त्यावेळी मित्राने मध्यस्थी केली असता, आरोपींनी त्यालाही मारहाण केली. दरम्यान, टोळक्याच्या राड्यामुळे परिसरातील दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने बंद केली. सहायक पोलिस निरीक्षक पोटे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...