आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे सामाजिक आणि राजकीय वर्तमान तसेच भारतीय समाजमनाचे दर्शन चित्रपटांतून घडते. त्यामुळे भारत समजून घ्यायचा असेल, तर व्यावसायिक चित्रपट पाहिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी व्यक्त केले. समाजाची भाषा आणि विचार करण्याची पद्धत बदलल्य़ाने चित्रपटही बदलला असून भारतीय चित्रपटाची वाटचाल प्रगल्भतेकडे होत आहे, असेही ते म्हणाले.
राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अख्तर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, सचिव रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर या वेळी उपस्थित होते.
अख्तर म्हणाले, चित्रपटांमध्ये गाणी कशाला, असे अनेकदा विचारले जाते. भारतीय चित्रपटांतील गीतांमध्ये लोकांचा विचार आणि समाजमनाचे तत्त्वज्ञान आहे. कथा अर्थवाही करणे ही भारतीय कलापरंपरा रामलीला, कृष्णलीला, नौटंकीपासून ते चित्रपटांमध्येही दिसते. मात्र, सध्याच्या चित्रपटांमध्ये गाणी केवळ मागच्या बाजूला वाजताना दिसतात.
साहीर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र हे गीतकार ऑस्कर आणि नोबेलचे दावेदार आहेत. शब्दांचा जीव अल्पकाळ असला, तरी गायकांच्या आवाजामुळे ती चिरकाल टिकतात, असे सांगून अख्तर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणी जागवल्या. देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीचे महत्त्व सांगितले.
जन्मशताब्दी संकल्पनेवर आधारित
हा महोत्सव लता मंगेशकर यांना समर्पित असून पं. भीमसेन जोशी, दिग्दर्शक सत्यजित राय आणि गीतकार साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी संकल्पनेवर बेतलेला आहे, असे पटेल यांनी प्रास्ताविकात सांगितले. शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे आणि यशवंत जाधव व कलाकारांनी नृत्य, गोंधळ आणि पोवाडा सादर केला. अभिनेता स्वप्निल जोशी आणि श्रेया बुगडे यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.