आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 80 वर्षे जुन्या वाड्यास भीषण आग:लाकडी खांब आणि छतामुळे उडाला भडका, एकाचा होरपळून मृत्यू

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकात मणिभवन वाड्यात एका घराला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. या घटनेत एक जण गंभीररित्या भाजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. निलेश ठक्कर (वय 40) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या आगीची घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक दलाच्या नियत्रंण कक्षास गुरुवारी रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा चौकाजवळ, मणिभवन वाडा येथे घरामधे आग लागली असल्याची माहिती मिळाली.

80 वर्ष जुना वाडा

अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी वाड्याला भीषण आग लागली होती. सदर वाडा हा 80 वर्ष जुना असून लाकडी आणि माती काम केलेला आहे. तळमजला आणि त्यावर दोन मजले असे त्याचे स्वरूप असून तळमजल्यावर दोन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये सदर आग लागल्याची घटना घडली. लाकडी खांब आणि छत यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली होती.

तातडीने दवाखान्यात नेले

अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात एक व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ब्रीदिंग प्रिकॉशन सूट घालून घरात प्रवेश केला. त्यानंतर टॉर्चच्या साह्याने घरात पाहणी केली असता, बाथरूम मध्ये एक जण त्यांना आढळून आला. नीलेश ठक्कर हा रहिवासी आगीमुळे गंभीर प्रमाणात भाजला होता. यामुळे त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले.

शॉर्ट सर्किटची शक्यता

मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाने काही तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. रात्री साडेबाराच्या सुमारास संपूर्ण आग विझली. दरम्यान, त्यानंतर कुलिंगचे काम कर्मचाऱ्यांनी सुरू केले. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी गजानन पात्रुडकर, प्रदीप खेडेकर, राजेश जगताप, तांडेल राजाराम केदारी, चालक राजू शेलार, फायरमन शफिक सय्यद, ऋषिकेश तांबे यांनी यावेळी आग विझवण्याचे काम केले.

बातम्या आणखी आहेत...