आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजाज इन्श्युरन्स कंपनीतुन बोलत असल्याची बतावणी करून शून्य टक्के दराने कर्ज मंजूरीच्या आमिषाने राज्यभरातील नागरिकांना गंडा घालणार्या बनावट कॉल सेंटरचा दत्तवाडी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. त्यांच्याकडून 40 मोबाईल 7 टीबी क्षमतेच्या कॉम्प्युटरच्या 11 हार्डडिस्क, 1 एनव्हीआर, जप्त करण्यात आले आहेत. संबंधित टोळीने राज्यभरातील नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.
दानेश रविंद्र ब्रिद (वय 25 रा. अंबरनाथ वेस्ट ठाणे ) आणि रोहित संतोष पांडे (वय - 24 रा. वागळे इस्टेट, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कॉल सेंटरमध्ये काम करणार्या मुला-मुलींना पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
बजाज फिंसर्व्ह लाईफ इन्शुरनची पॉलिसी काढल्यानंतर शून्य टक्के व्याज दराने 50 लाखांचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची लुट केली जात होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईतील मुलूंड परिसरात असल्याची माहिती काढली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय सरवदे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी कॉलसेंटरमध्ये 43 जण काम करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत, 40 मोबाइल आणि इतर ऐवज जप्त केला.
बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड
टोळीकडून राज्यभरातील विविध शहरातील नागरिकांना फोन करून बजाज इन्श्युरन्स कंपनीतुन बोलत असल्याची बतावणी केली जात होती. नागरिकांनी 50 लाखांची पॉलिसी काढल्यानंतर 50 लाख रूपयांचे कर्ज शून्य टक्क्यांनी देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यानंतर प्रीमियम म्हणून 1 ते 3 लाख रूपये घेउन फसवणूक केली जात होती. मात्र, दत्तवाडी पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी सुनिल पवार, वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरिक्षक, विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक अक्षय सरवदे, पोलिस अंमलदार काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव, प्रसाद पोतदार यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.