आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्शन अपडेट:पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी 18 मे रोजी मतदान

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येतील. २९ एप्रिल, ३० एप्रिल आणि १ मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल.

कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मार्च २०२३ अखेरची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहितीचा नमुना ईआर-१ प्रत्येक तिमाहीस सादर करणे आवश्यक आहे असे प्र.सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी सांगितले आहे.