आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातल्याने पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे पुणे पोलिसांनी आता कोयत्या खरेदी-विक्रीवरच बारीक लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. आधार कार्डशिवाय कोयत्याची विक्री करु नये, अशी सक्त ताकीद पुणे पोलिसांनी विक्रेत्यांना दिली आहे.
अजित पवारांनीही सुनावले
भररस्त्यात हवेत कोयता नाचवून दहशत निर्माण करणे, कोयत्याचा धाक दाखवून लुटणे, मारहाण करणे, अशा घटना गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने घडत आहेत. अशा टवाळखोरांना रोखण्यात पुणे पोलिसांनाही म्हणावे तसे यश मिळत नाहीये. त्यामुळे पुणे पोलिसांनी अशा टवाळखोरांना पकडणाऱ्यांसाठी बक्षिसे जाहीर केली आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका करुन अशाप्रकारे सरसकट गुन्हेगारांना पकडण्यासाठी बक्षिसे जाहीर करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील शहरातील कृषी अवजारे विक्रेत्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोयत्यासारखे अवजारे विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड तपशील नोंदवून घ्या, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
केवळ योग्य वापरासाठीच खरेदी हवी
या निर्णयाबाबत पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले की, आम्ही शहरातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या सूचना कृषी अवजारांच्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोयत्यासारखी अवजारे केवळ शेती व इतर वैध कारणांसाठीच खरेदी केली जाताय ना, याचीही विक्रेत्यांनी खबरदारी बाळगावी व अल्पवयीन मुलांना कोयता विक्री करु नये, अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत.
कोयत्यासोबत बिलहूकचाही वापर
कोयत्यासोबतच टवाळखोर गुंडगिरीसाठी बिलहूकचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कोयत्यासोबतच बिलहूकची विक्री करतानाही विक्रेत्यांनी हीच खबरदारी बाळगावी, असे अमोल झेंडे यांनी सांगितले.
तर, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, कोयता तसेच बिलहूकच्या किरकोळ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोयता व बिलहूक खरेदी करणाऱ्यांचे आधार क्रमांक व इतर तपशील विक्रेत्यांनी नोंदवणे बंधनकारक आहे. पुण्यातील गुंडगिरीच्या अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलेही कोयत्याचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना कोयता विक्री करण्यास बंदी व इतर खरेदीदारांची नोंद ठेवण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.