आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाॅकडाऊनमुळे अनेक ठिकाणी लाेक अडकून पडले आहेत. अनेक मजूर, कामगारांनी त्यांच्या मूळ गावी जाण्याकरिता पायी जाण्याची चालवलेली धडपड आपण पाहतो आहोत. लाॅकडाऊनमध्ये गावी अडकलेल्या मुलाच्या ओढीने एका दिव्यांग मातेने पिंपरी ते अमरावती असा दुहेरी दुचाकीवर १४०० किमीचा प्रवास करत मुलाला सुखरूप घरी आणले आहे.
सोनू खंदारे या भाेसरीतील फरांदे प्रमाेटर्स येथे अकाउंट विभागात, तर त्यांचे पती गिरधारी घरीच टेलरिंगचे काम करतात. तर, १४ वर्षांचा मुलगा प्रतीक नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे. अमरावतीमधील काेकर्डीगाव येथे त्यांचे वयाेवृद्ध सासू-सासरे राहत असून प्रतीकच्या छाेट्या चुलत बहिणीला गावी साेडण्याकरिता दाेघे बहीण-भाऊ १७ मार्चला गावी गेले हाेते. मात्र, त्यानंतर लाॅकडाऊन लागू झाला आणि प्रतीक गावीच अडकून पडला. गावी त्याच्याकडे पाहणारे काेणी नसल्याने आईला चिंता वाटू लागली. मग त्यांनी पाेलिस आयुक्त कार्यालय गाठत परवानगी मागितली. २३ एप्रिलला त्यांना दाेन दिवसांची प्रवास परवानगी देण्यात आली. त्यांनी स्वत:च्या दुचाकीवरच गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासाकरिता एकालाच परवानगी असल्याने साेनू खंदारे या तातडीने गावी जाण्याकरिता निघाल्या. मात्र, रस्त्यात अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. महामार्गावर सर्व दुकाने बंद, रस्त्यावर काेणीच नाही, कुठे थांबावे तर क्वाॅरंटाइन करण्याची भीती. खराब रस्ता, अंधार, पिण्याकरिता पाणीही देण्यास काेणी तयार नाही, रणरणते ऊन, त्यातच गाडीवर जाताना एका बाजूचे टायर फुटले, तर एका जागी गाडीतील आॅइल खराब झाले. अशा वेगवेगळ्या अडचणी त्यांना प्रवासादरम्यान जाणवल्या. जालना रस्त्यावर एका पेट्राेल पंपावरच रात्रीचा मुक्काम करत त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पाचला पुन्हा प्रवासाला सुरुवात करत दुपारी तीनच्या दरम्यान त्या गावी पाेहोचल्या. त्या दिवशी मुक्काम करत २५ एप्रिलला सकाळी सहाला अमरावतीवरून प्रवासला सुरुवात करत सलग १६ ते १७ तास दुचाकी चालवत रात्री ११ वाजता मुलाला सुखरूप पिंपरीतील घरी आणले.
मुलाशिवाय राहू शकत नव्हते
पिंपरी-पुणे शहर साेडून इतरत्र कुठेही लांब मी अद्याप दुचाकी घेऊन गेले नव्हते. परंतु मुलगा मी पायी घरी येताे, असे म्हणू लागला. मुलाशिवाय राहणे मला शक्य हाेत नव्हते. खासगी गाडीसाठी पैसे नसल्याने मी दुचाकीवर जाण्याचा निर्णय घेतला. मी मुलास घरी आणू शकले याचा मला आनंद आहे. मुलाची आणि माझी वैद्यकीय चाचणी करून हाेम क्वारंटाइन झालेली आहे. सलग १६ ते १७ तास गाडी चालवून हात-पाय सुजले, मुलाला भेटल्याचा आनंद असल्याचे साेनू खंदारे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.