आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापटांचा वारसदार कोण?:पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची 5 नावे स्पर्धेत, पण चर्चा न करण्याचा बावनकुळेंचा सल्ला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचा राजकीय वारसदार कोण, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, जगदीश मुळीक, संजय काकडे ही नावे चर्चेत आहेत.

मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही चर्चा करू नका. मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही असे म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे.

यांची नावे चर्चेत

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या दोघांची नावे सध्या चर्चेत आहे.

चर्चा करू नका-बावनकुळे

याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पुणे लोकसभेबाबत तूर्तास मी चर्चा घडवणार नाही, तुम्ही ही घडवू नका. पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही चर्चा करू नका. मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही, अशी सावध प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.

स्वरदा भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष

गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट-केळकर यांच्या नावाचीही पुणे पोटनिवडणुकीसाठी चर्चा आहे. त्या राजकारणात सक्रिय असून भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तर महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्यही आहेत. तत्पूर्वी त्या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेत नगरसेविकाही होत्या. त्या भाजपच्या महिला नेता नीता केळकर यांच्या कन्या आहेत. स्वरदा या भारतीय जनता पक्षाच्या विविध कार्यक्रम व उपक्रमांत उपस्थित असतात.

पक्ष सर्व्हे करेल-काकडे

भाजपकडून जी नावे चर्चेत आहेत त्या प्रत्येकाचे पुण्यातील विविध विकासकामांमध्ये योगदान आहे. मात्र भाजपकडून अजून कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. जर पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच निवडणुक लढविणार अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली आहे. काकडे म्हणाले, मी इच्छुक आहे. मात्र ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम मी करणार. पक्ष सर्व्हे करेल त्यात ज्याला पसंती भेटेल त्याचे नाव केंद्रीय समितीकडून जाहीर करण्यात येईल.

असा निर्णय होऊ शकतो

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजप गिरीश बापट यांच्या कुटुंबातच उमेदवारी देऊ शकते. कसब्यात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने भाजपला ब्राम्हण मतदारांचा रोष सहन करावा लागला होता.